मंत्रीपद मिळाल्यानंतर बच्चू कडू दिव्यांगाना विसरले का? दिव्या मंत्रालयाची पायरी झिजवूनही मदत नाही..
लॉकडाऊन (lockdown) म्हटलं की, आता अनेकांच्या पोटात गोळा येतो. कोरोनाला (corona) रोखण्यासाठी सरकारने लावलेल्या लॉकडाऊनने अनेकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे. लाख लाख रुपयांचा पगार घेणाऱ्यांपासून 10 आणि 15 हजार रुपये महिन्याला पगार घेणाऱ्या लोकांना सध्या घरी बसावं लागलं आहे. त्यातच दिव्यांगाचा जर विचार केला तर त्यांचे काय हाल झाले असतील... याचा विचारच न केलेला बरा. National Centre for the Promotion of Employment for Disabled Persons (NCPEDP) च्या अभ्यासानुसार देशातील 73 % दिव्यांगाना लॉकडाउनचा मोठा फटका बसला आहे.
2011 च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 2.21 टक्के दिव्यांग आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगातील एकूण लोकसंख्येच्या 15 टक्के लोक दिव्यांग आहेत. त्यातच दुसऱ्यावर अवलंबून असणाऱ्या दिव्यांगाने या काळात physical Distance कसं ठेवायचं असा प्रश्न आहे.
मुंबईत राहणाऱ्या दिव्यांगाची नक्की काय परिस्थिती आहे. या संदर्भात आम्ही भानूप्रिया यांची भेट घेतली. भानूप्रिया दिव्यांग आहेत... मुंबई मध्ये वडाळा येथे भाड्यानं राहतात. एक मुलगा एक मुलगी आहे. तीन व्यक्तीचा संसार... घरं भाडं 7 हजार रुपये...
भानूप्रिया यांच्या अंगी अनेक कला आहेत. ती एक राज्यस्तरीय क्रीडापटू आहे. तिला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. ती चांगली गाते देखील, तिला चांगलं विणकाम करता येतं. इतक्या कला असुनही भानूप्रिया आज उपाशी आहे.
भानुप्रिया य़ांना मिळालेलं मेडल पाहिले तर आपल्या देशात कलेची आणि कलाकरांची, खेळाडूंची किंमत केली जात नाही. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.. त्यात चूक काही नाही. कारण इतक्या सर्व कला, येऊनही भानूच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला नसता. लॉकडाऊनच्या अगोदर शिवणकाम करुन भानुप्रिया आपलं पोट भरत असे. मात्र, लॉकडाऊन नंतर तिचं काम थांबलं. आता तिच्याकडं कोणतंही शिवणकाम येत नाही. असं ती सांगते...
सध्या मी मास्क विक्री करुन माझा उदर निर्वाह चालवण्याचा प्रयत्न करते. मात्र, ते करुनही माझं घर आणि घर खर्च भागेल इतके पैसे येत नाही. असं ती सांगते. मी या भागात राहायला आले. कारण तो झोपडपट्टीचा भाग आहे. तो भाग चांगला नव्हता. माझी मुलगी आता 10 वीला गेली. भीती वाटते. म्हणून मी 7 हजार रुपये भाड्याने देऊन इथं राहायला आले. त्यातच लॉकडाऊन लागलं. हातचं काम बंद पडलं. त्यामुळं मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
हाताला काहीच काम नाही तर भाडं कुठून भरायचं? गेल्या कित्येक महिन्याचं भाडं थकलं आहे. पुर्वी एक ड्रेस शिवला तरी 300 ते 400 रुपये मिळायचे. आता ते बंद झालं. शासनाकडून काही मदत मिळाली असा प्रश्न विचारला असता, भानूप्रिया संताप व्यक्त करतात. आम्हाला फक्त रेशन मिळतं. अनेक दिव्यांग व्यक्तीच्या घरात अक्षरश: रेशनचे गोडाउन झालं आहे. असं म्हणत... भानूप्रिया संताप व्यक्त करतात.
हे राशन काय कच्च खायचं का? त्याला शिजवायला गॅस लागत नाही का? रॉकेल लागत नाही का? मीठ मिरची लागत नाही का? असा सवाल भानू करतात. भानू यांच्या मते आम्हाला जे कोणी मदत करेल त्यांनी आर्थिक मदत करावी. राशन देऊ नये. दिव्यांगांना गोळ्या औषधांसाठी खर्च लागतो. त्यासाठी पैसे कुठून आणायचे? या लॉकडाऊनच्या काळात सर्व काही एकदम शून्यच झालं आहे. कुठं काही काम धंदा नाही... कुंठ काही धंदा लावायला देत नाही. कुठं काही Business करु देत नाही. माझं म्हणणं असं आहे. की, कुठल्या तरी संस्थेनं हाताला काम द्यावं. असं भानू सांगतात.
दिव्यांग सरकारला भीक मागत नाही... काम मागत आहेत. सरकारने आम्हाला रोजगार द्यावा. आम्ही कोरोनाने नाही मरणार... आम्ही उपाशी मरु... लॉकडाऊन च्या काळात घराचं भाडं कसं भरणार? घर कसं चालणारं? या विचारात अनेक दिव्यांग डिप्रेशन मध्ये येतात. काहींना Attack येतो. काही लोक आत्महत्या करण्याचा विचार करत आहेत.
ते मरण बरं आहे का? हे कोरोनाचं मरण बरं आहे? डोळ्यातील अश्रू पुसत भानूप्रिया म्हणते आता खूप त्रास होत आहे. कोरोनाचं काही वाटत नाही. शासनाकडून दिव्यांगांना एक रुपये मदत नाही. रेशन द्यायची काही लिमिट असते. तुमच्याकडे एवढा पत्रव्यवहार करुन एक रुपया मिळाला नाही...
आमची सरकारकडून काही अपेक्षा नाही. सरकारने आम्हाला हाताला काम द्यावं. त्या पैशातून आणून आम्ही खाऊ. काही तरी काम करण्यास जागा द्यावी. खेळामध्ये कित्येक पुरस्कार घेतलेल्या भानूप्रिया म्हणतात... फक्त गोल्डन मेडल मिळवून काय होत नाही. राज्य पुरस्कार मिळवून काय होतं? पोट भरतं का? असा सवाल भानूप्रिया विचारतात.
भाजी विक्रेत्यांना जागा देतात. विक्री करण्यासाठी स्टॉल उपलब्ध करुन देतात. दिव्यांगाना का देत नाही. दिव्यांग काही विकत असेल तर त्याला हाकलून देतात. भाजी विक्रेत्याला बरोबर ही जागा देतात. अरे मग दिव्यांगाने काय करायचं? असा सवाल भानू प्रिया करतात...
सध्या ते मास्क विकण्याचं काम करतात. मास्क विकून त्यांना 60 ते 70 रुपये मिळतात... यात त्यांचं कुटूंब कसं चालणार? असा सवाल करत भानूप्रिया सरकारला हाताला काम मागत आहे.
सध्या कोरोनामुळं देशात सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारी नुसार मे महिन्यात देशातील बेरोजगारीचा दर २७. १ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. लॉकडाउनमुळे हाताला कामच उरलं नसल्याने महिनाभरात १२ कोटी २० लाखांहून अधिक कामगार बेरोजगार झाले आहेत. सध्या ऑगस्ट महिना सुरु आहे. त्यामुळे हा आकडा निश्चित वाढला असणार...
ही सर्व आकडेवारी पाहिली तर एक बाब लक्षात येते. ती म्हणजे सध्याच्या घ़डीला जर सर्वसामान्य लोकांच्या इतक्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गेल्या असतील तर दिव्यांगाची काय परिस्थिती असेल... दरम्यान दिव्यांगाचा आधार अशी ओळख असलेले बच्चू कडू आता मंत्री झाले आहेत. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रच्या युट्यूब आणि फेसबूक चॅनलवर जेव्हा वृत्त प्रसारीत झाले. तेव्हा बच्चू कडू यांनी तात्काळ मॅक्समहाराष्ट्र शी संवाद साधला. या महिलेची माहिती घेतली. आणि तिला रोख रक्कम मदत पाठवली.