राज्यातील कॉग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला -विखे पाटलांनी अखेर व्यक्त केली खदखद

Update: 2019-04-25 09:15 GMT

कॉंग्रेसमध्ये राहून भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणा-या विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर आपली खदखद व्यक्त केली आहे. त्यांनी कॉंग्रेसचा अथवा विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा दिला नसला अथवा त्यांच्यावर कोणतीही कारवाई अद्याप झाली नसली तरी त्यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. राज्यातील काँग्रेस ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली असून ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली आहे. काँग्रेससाठी ज्यांनी काहीच काम केले नाही ते आता काँग्रेस उभी करायला निघाले आहेत, असा आरोप विखे यांनी केला. श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे माजी नगराध्यक्ष संजय फंड यांच्या वस्तीवर आयोजित केलेल्या ससाणे समर्थकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी विखे म्हणाले,

ही राजकीय लढाई आपल्या अस्तित्वाची व अस्मितेची आहे. त्यामुळे तुम्ही कामाला लागा. कार्यकर्त्यांनी कुठल्याही आमिषाची अपेक्षा ठेवू नये. काँग्रेस पक्षाने माझ्यावर कारवाई करावी यासाठी काही जण देव पाण्यात बुडवून बसले आहेत. ज्या पक्षासाठी मी पाच वर्षे संघर्ष केला, सरकार विरोधी भूमिका घेऊनही जो पक्ष माझ्यासोबत राहिला नाही, तो तुमच्या मागे कसा राहील,

असा उपरोधिक सवालही विखे यांनी केला.

राहाता तालुक्यातील गावांमधील प्रचारादरम्यान कोणाला समर्थन द्यायचे ते जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले तर त्यावेळी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करू, असेही ते म्हणाले. तसेच आपण स्वत: ससाणे यांच्या कार्यालयात नेहमी भेट देऊन अडचणी सोडवणार आहे. ससाणे यांना राजकीय ताकद देऊ, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

Similar News