महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध भाजप असा कलगीतुरा रंगण्याची चिन्ह आहेत. कारण वर्धा येथील सभेत मोदींनी कॉंग्रेसपेक्षा शरद पवारांवरच निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे मोदींनी यावेळी शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका केली. ''पवारांच्या कुटुंबात कलह सुरू असून, अजित पवार पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत,''. त्यावर पवारांनी मोदींना खणखणीत उत्तर दिलं आहे.
'माझ्या कुटुंबाची चिंता मोदींनी करू नये,'' असं पवारांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात झालेल्या प्रचार सभेत बोलत होते. काय म्हणाले पवार?
'दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी मोदी आमच्या कुटुंबावर बोलले. माझी आई कोल्हापुरातील होती. त्यामुळे आमच्यावर पंचगंगेच्या पाण्याचे संस्कार आहेत. घर सांभाळण्यात कोल्हापूरच्या कन्येचा कोणीच हात धरू शकत नाही. मोदींनी पवार कुटुंबाची चिंता करू नये. राष्ट्रवादी हा लक्षावधी लोकांनी उभा केलेला पक्ष आहे. पक्षातील पुढील पिढीवरही असेच संस्कार आहेत.'