मुख्यमंत्र्यांच्या सूचनेकडे आरोग्यमंत्र्यांचं दुर्लक्ष? केरळकडून येणारी मदत रखडली
संपूर्ण देशात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात आहेत. दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर रुग्णांवर चांगले उपचार व्हावे यासाठी ज्यादा आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज आहे. पण राज्य सरकारमध्ये या मुद्यावरही ताळमेळ नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
मॅक्स महाराष्ट्राने याआधी दिलेल्या वृत्तानुसार केरळमधील डॉक्टरांना मुंबईत रुग्णांवर उपचार करण्य़ासाठी पाठवावे, अशी विनंती केरळ सरकारला करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. पण केरळमध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने केरळचे आरोग्य कर्मचारी महाराष्ट्रात पाठवण्यास विरोध केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राला उशीर झाला. १० जून रोजी निर्णय झाला आणि २२ जून रोजी मुख्यमंत्र्यांचे पत्र तयार होते. पण ते पत्र ३ जुलै रोजी केरळला पाठवण्यात आले.
राज्यातील काँग्रेस नेत्यांनी यात पुरेसा पाठपुरावा केला नसल्याचे दिसले. तर याहून धक्कादायक बाब म्हणजे १० जून रोजी ज्या बैठकीत केरळमधून आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत मागवण्य़ाचा निर्णय झाला, त्याच बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे हे केरळमधून किती आणि कोणते आरोग्य कर्मचारी लागणार आहेत, याची माहिती देणारे पत्र केरळच्या आरोग्यमंत्र्यांना पाठवतील असेही ठरले होते. पण राजेश टोपे यांनी असे कोणतेही पत्र पाठवले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यामुळे मुख्यमंत्री तोंडघशी पडले आहेत, कारण केरळच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्राला उत्तर देत नेमकी काय मदत हवी आहे याची विचारणा केली आहे, तसे पत्र ४ दिवसांपूर्वी राज्य सरकारला आले आहे. त्यामुळे केरळकडून मदत येण्यास आणखी उशीर होणार आहे. एकूणच मुख्यमंत्र्यांच्या सूचनेकडेसुद्धा दुर्लक्ष केले जात असल्याचे सिद्ध झाले आहे.
याबद्दल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना विचारले असता, सरकारमध्ये कोणताही विसंवाद नसून मुंबईत आता परिस्थिती आटोक्यात असल्याने ज्यादा कर्मचाऱ्यांची गरज नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. राजेश टोपेंच्या पत्राला उशीर का झाला याचे उत्तर तेच देऊ शकतील असंही मलिक यांनी म्हटले आहे. पण राजेश टोपे यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा संपर्क होऊ शकला नाही.
केरळमधील डॉक्टरांना बोलावण्यासाठी ठाणे महापालिकेचे प्रयत्न
एकीकडे मुंबईत केरळच्य़ा डॉक्टरांना बोलावण्याची प्रक्रिया रखडली असताना आता ठाणे महापालिकेने थेट केरळमधून डॉक्टरांना बोलावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ठाण्यात कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी स्वत: रस्त्यावर उतरुन प्रयत्न करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आता थेट ठाणे महापालिकेतर्फे केरळ सरकारला आरोग्य कर्मचारी पुरवण्याची विनंती केली आहे, अशी माहितीही सूत्रांनी मॅक्स महाराष्ट्रला दिली आहे. यात ५०० नर्सेस आणि ५० ICU तज्ज्ञ डॉक्टरांना पाठवण्याची मागणी कऱण्यात आली आहे. यासाठी या ICU तज्ज्ञ डॉक्टरांना सध्या दिले जात असलेल्या महिना दोन लाखांऐवजी अडीच लाख रुपये देण्याची तयारीही ठाणे महापालिकेने दाखवली आहे. केरळमधील डॉक्टरांना मुंबई महापालिकेतून पगाराबाबत जो अनुभव आला आहे, त्यामुळे ठाणे महापालिकेने या आरोग्य कर्मचाऱ्यांना जादा मोबदला देण्याचे आश्वासन दिल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जी पावलं महिनाभरापूर्वी उचलायला हवी होती ती एकनाथ शिंदे यांनी आता ठाणे महापालिकेसाठी उचलली आहेत. एकूणच मुख्य़मंत्र्यांनी आदेश देऊनही राजेश टोपे यांनी महाराष्ट्राला किती नर्सेस आणि किती डॉक्टर लागणार आहेत याची माहिती केरळ सरकारला का दिली नाही असा प्रश्न पडतोय. मुख्यमंत्र्यांचा आपल्याच मंत्र्यांवर वचक नाहीये का, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.