मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील पिंपळशेत ग्रामपंचायतमधील हुंबरन या आदिवासी पाड्यावर एका गरोदार महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचे बाळ दगवल्याची घटना घडली होती. या पाड्यावर सोयीसुविधांचा पूर्णतः अभाव असल्याचे वास्तव मॅक्स महाराष्ट्रने दाखवले. हे वृत्त पाहिल्यानंतर आता जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती निलेश सांबरे यांनी तातडीने या पाड्याकरीता अम्ब्युलन्सची सोय करण्याची घोषणा केली आहे. तसेच मागेल त्या गावात पुढील काही काळात अँम्ब्युलन्स दिल्या जातील, असेही सांगितले आहे.
27 नोव्हेंबर रोजी 11:00 वाजता या गरोदर महिलेला प्रस्तुतीच्या वेदना सुरू झाल्या. तिला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्याकरीता तिचे पती पायी 5 किमी अंतवरावर असलेल्या कीन्हवली गावात चालत गेले. परंतु गाडीभाडे द्यायला पैसे नसल्याने तेथील गाडी मालकाने यायला नकार दिला. यामध्ये बराच उशीर झाला. यावेळी दवाखान्याची रुग्णवाहिका देखील उपलब्ध झाली नाही.
नंतर बऱ्याच उशिराने शेजारच्या गावातील वाहन उपलब्ध झाले. परंतु या पाड्यावर पोहचण्यासाठी रस्त्याची सुविधा नसल्याने 3 किमीचा डोंगर उतरुन पायी चालत गेल्याशिवाय पर्याय नव्हता. यावेळी लाकडाची डोली करून डोंगर माथ्याची वाट तुडवत लगबगीने तिचे कुटुंब तिला दवाखान्यात घेऊन जात असताना अर्ध्या रस्त्यातच ती महिला प्रसूत झाली. पण तिचे बाळ मात्र दगावले.
एम्ब्लुलन्सची सोय होते आहे हे चांगले आहे पण शासकीय यंत्रणेने या आदिवासी बांधवांच्या सोयीसाठी सुविधा निर्माण करण्याची गरज आहे.
आदिवासी बांधवांची परवड, वेळेत उपचार न मिळाल्याने अर्धा रस्त्यात बाळाचा मृत्यू