मॅक्स महाराष्ट्रनं लोकसभा निवडणुकीच्या काळात ‘जनतेचा जाहीरनामा’ या कार्यक्रमातून लोकांचं म्हणणं मांडलं होतं. त्यातून अनेक प्रश्न चव्हाट्यावर आणले गेले. त्यातले अनेक मुद्दे तर राजकीय पक्षांच्या अजेंड्यावरही नव्हते. ‘जनतेचा जाहीरनामा’ मधून गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम भागातील पदाबोरीया या गावामध्ये विजेचे मीटर बसवण्यात आले होते. मात्र, किरकोळ दुरूस्तीअभावी गेल्या एक वर्षांपासून पदाबोरीया गाव हे अंधारातच होतं.
मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी हा प्रश्न चव्हाट्यावर आणल्यानंतर जागे झालेल्या प्रशासनानं वीज पुरवठ्यातील किरकोळ दुरूस्त्या केल्या आहेत. त्यामुळं पदाबोरीयाच्या खांबांपर्यंत वीज पोहोचली असून लवकरच ती ग्रामस्थांच्या घरापर्यंत पोहचण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गावातला वीजेचा ट्रान्सफार्मर तर दुरूस्त झाला आहे, पण जोपर्यंत ग्रामस्थांच्या घरापर्यंत ही वीज पोहोचणार नाही तोपर्यंत मॅक्स महाराष्ट्र त्याचा पाठपुरावा करणार आहे. सरकारी काम अन् कित्येक दिवस थांब असा आजवरचा अनुभव ग्रामस्थांनी घेतला होता. मात्र, मॅक्स महाराष्ट्रच्या पाठपुराव्यानंतर तातडीनं यंत्रणा सक्रिय होऊन गावाच्या खांबापर्यंत वीज पोहोचवल्याबद्दल ग्रामस्थांनी मॅक्स महाराष्ट्रचे आभार मानले आहेत.