लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी झालेल्या मतदानात राज्यात पुण्याने सर्वांत कमी मतदानाची टक्केवारी नोंदवली. पुण्यात पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाल्यानंतर पुण्याचा सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर हा दर्जा काढून घ्यायला हवा असं मला वाटतं.
मतदानाच्या कमी टक्केवारीवर अनेक पुणेकरांनी वेगवेळे जोक फॉरवर्ड करायला सुरुवात केलीय. पुढच्या निवडणुकीत ईव्हीएम घरोघरी फिरवा पासून एक ते चार मतदान बंद ठेवा पर्यंत. पुण्याच्या काही लोकांना आपल्या अशा विक्षिप्तपणाचा नको तितका गर्व आहे. हा विक्षिप्तपणा लोकशाहीविरोधी आहे. मतदानात कमी टक्केवारी असली तरी दुसऱ्यांना टोमणे मारणे आणि अक्कल शिकवण्यात आम्ही 100 टक्के आहोत. असा दुसरा एक मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला आहे. हे जर पुणेकरांना भुषणावह वाटत असेल तर ही शोकांतिकाच आहे.
पुण्यातील कसबा, हिंजवडी अशा उच्चशिक्षित भागांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरलीय. सध्या देशभरात हेच चित्र दिसतंय. कमी शिकलेल्या किंवा संसाधनांची कमतरता असलेल्या भागांमध्ये लोक जागरूकपणे मतदानाला जातात. लोकशाहीचा हा सण साजरा करतात. इतर सणांच्या दिवशी पुणे सजून-धजून रस्त्यावर उतरलेलं असतं. लोकशाहीच्या या सणात पुणेकरांचा निरूत्साह गंभीर आहे. जर खूप शिकल्याने देशाची चिंता वाटणं कमी होत असेल तर आपल्या शिक्षणपद्दतीवर सुद्धा पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.