सरन्यायाधीशांना बदनाम करण्याची मलाही ऑफर आली होती – उत्सव बैंस

Update: 2019-04-22 06:24 GMT

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप त्यांच्या एका माजी महिला सहकाऱ्याने केल्यानंतर सरन्यायाधीश गोगोई यांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय बेंचने शनिवारी या प्रकरणावर सुनावणी केली. आणि सदर प्रकरणात आपली मत मांडली. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयातील वकील उत्सव बैंस यांनी सरन्यायाधीश यांना बदनाम करण्याची ऑफर आली होती तसंच त्यासाठी मोठी लाच देण्याचा प्रयत्न संबंधितांनी केल्याचे बैंस यांनी म्हटले आहे.

Full View

सरन्यायाधीश रंजन गोगाई यांना सरन्यायाधीश पदाचा राजीनामा द्यावा लागेल अशा प्रकारे त्यांची बदनामी करण्याचा कट होता. त्यासाठी आपल्याला लाच देऊ केल्याचा दावा देखील बैंस यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला आहे. तसंच सदर बाब आपण सरन्यायाधीश यांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांच्या घरीसुद्धा गेलो, पण ते घरी नसल्याने त्यांची भेट झाली नसल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

काय आहे महिलेचा आरोप?

आरोप करणाऱ्या महिलेनी सुप्रीम कोर्टाच्या 22 न्यायमूर्तींना एक पत्र लिहिलं असून संबंधांना सहमती न दर्शवल्यामुळे मला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे माझ्या कुटुंबाला त्रास देण्यात आला असा आरोप त्या महिलेने केला आहे.

दरम्यान या प्रकरणाची शनिवारी तातडीने सुनावणी झाली. या सुनावणीत सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून न्यायपालिकेचं स्वातंत्र्य धोक्यात आहे. जर अशा स्थितीत न्यायाधीशांना काम करावं लागणार असेल तर चांगले लोक कधीच या पदावर काम करण्यास इच्छुक राहणार नाहीत. लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या महिलेच्या पाठीशी काही शक्तिशाली लोक आहेत. न्यायपालिकेला अस्थिर करण्यासाठी मोठं षडयंत्र रचल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला नाही. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता

"न्यायपालिकेचं स्वातंत्र्य अबाधित राहावं, या दृष्टीने माध्यमांनी संयम बाळगावा,"

असं आवाहन तीन सदस्यीय पीठाने केलं आहे.

Similar News