जयपूर - लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राजस्थान काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर येत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपले पुत्र वैभव गेहलोत यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना जबाबदार धरले आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांच्या मुलाचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला आहे.
वैभव गेहलोत जोधपूरमधून निवडणूक लढवत होते. सचिन पायलट यांनी आपला मुलगा वैभव गेहलोत यांच्या पराभवाची जबाबदारी घ्यायला हवी असे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देत गेहलोत यांच्या या वक्तव्याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.
गेहलोत म्हणाले की आमच्या दोघांमध्ये कोणतेही मतभेद नाही. तसेच 'वैभव हे मोठ्या फरकाने जिंकतील असे पायलट यांनीच म्हटले होते, याचे कारण म्हणजे या मतदारसंघात काँग्रेसचे 6 आमदार आहेत. आमचा निवडणूक प्रचारही उत्तम होता. त्यामुळेच सचिन पायलट यांनी वैभव गेहलोत यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मला वाटते की ही एक सामूहिक जबाबदारी आहे' असं गेहलोत यांनी म्हटलं आहे.