हरिसालचा Fact Check

Update: 2019-04-23 14:22 GMT

देशातलं पहिलं डिजीटल गाव म्हणून जाहिरात करण्यात आलेल्या हरिसालची पोलखोल मनसे प्रमुख राज ठाकरेंनी नुकतीच सोलापूरमधल्या सभेत केली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर राज ठाकरे यांचा तो व्हिडीओच फेक असल्याचं सिद्ध करण्यासाठी धडपड सुरू झाली. हरिसालचे उपसरपंच गणेश महादेव येवले यांनी सोमवारी (२२ एप्रिल) रोजी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हरिसाल कसं संपूर्णपणे डिजीटल झालं आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

घटनाक्रम...

राज ठाकरेंनी १५ एप्रिल २०१९ ला सोलापूर इथं जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी मोदी-फडणवीस सरकारच्या दाव्यांची पोलखोल करणारे व्हिडीओ दाखवले. यात अमरावती जिल्ह्यातील धामणी तालुक्यातल्या हरिसाल या देशातील पहिल्या डिजीटल गावाच्याही एका व्हिडीओचा समावेश होता. यामध्ये महादेव खडके या युवकालाच राज यांनी व्यासपीठावर बोलावलं. होय, मी लाभार्थी या डिजीटल इंडियाच्या जाहिरातीत महादेवचा समावेश होता. मात्र, प्रत्यक्षात हरिसाल सोडून पुण्यात खासगी नोकरी करत असल्याचं महादेवनं सांगितलं. हाच महादेव मी लाभार्थीच्या जाहिरातीत हरिसाल डिजीटल झाल्यामुळं त्याला रोजगार मिळाल्याचं सांगत होता.

सात दिवसांनंतर हरिसालच्या उपसरपंचांना जाग आली ?

१५ एप्रिलला राज यांनी डिजीटल हरिसालची पोलखोल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उपसरपंच गणेश येवले यांनी फेसबुक लाईव्ह किंवा इतर डिजीटल माध्यमातून राज यांना प्रत्युत्तर का दिलं नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. शिवाय उपसपंच येवले हे स्वतःही www.facebook.com/ganesh.yeole या फेसबुकचा वापर करतात. १० एप्रिल २०१७ पासून ते या फेसबुक अकाऊंटचा वापर करतात. १० एप्रिल २०१७ ते ५ जुलै २०१८ या कालाधीत येवले यांनी फक्त ६ पोस्ट या फेसबुकवर टाकलेल्या आहेत. या सहा पोस्टमध्ये फक्त छायाचित्र आहेत, एकही अक्षर येवले यांनी लिहिलेलं नाही. त्यामुळं मुळातच येवले हे डिजीटली किती साक्षर आहेत, याबाबत शंका उपस्थित होते. जर येवले हे डिजीटली साक्षर असते तर त्यांनी राज ठाकरेंच्या त्या व्हिडीओला दुसऱ्याच दिवशी का नाही प्रत्युत्तर दिलं, असा प्रश्न उपस्थित होतो. येवले यांच्या वैयक्तिक फेसबुक अकाऊंटवर ते भाजपचे कार्यकर्ते असल्याचं स्पष्टपणे जाणवतं. तशा फोटोजचा वापरही त्यांनी आपल्या अकाऊंटवर केलेला आहे.

हरिसालचं फेसबुक पेजही सक्रिय नाही

हरिसालचे उपसरपंच येवले यांनी ज्या हरिसाल डिजीटल (www.facebook.com/HarisalDigital) फेसबुक पेजवरून सोमवारी (22 एप्रिल) लाईव्ह केलं. ते पेज 28 नोव्हेंबर 2015 मध्ये तयार करण्यात आलं आहे. या पेजवर 22 फेब्रुवारी 2017 रोजी शेवटची पोस्ट टाकण्यात आली होती. 2017 मध्ये तीच एकमेव पोस्ट फेसबुकवर होती. यानंतर पेजच्या सुरूवातीपासूनचा ट्रॅक तपासला असता त्यात दरवर्षी साधारणतः 2016 मध्ये सहा तर 2015 11 पोस्ट टाकण्यात आल्या होत्या. यावरूनही गावात किती प्रमाणात डिजीटल साक्षरता वाढीस लागली होती, याचा अंदाज येतोय.

राज ठाकरेंच्या सोलापूरमधील सभेत हरिसालचा उल्लेख झाल्यानंतर मधल्या सात दिवसात हरिसालमधून कुणीच वस्तुस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही.

2011 च्या जनगणनेनुसार हरिसाल गावात 324 कुटुंब असून त्यांची लोकसंख्या ही 1479 इतकी आहे. हरिसालच्या फेसबुक पेजला 2371 जण लाईक आणि फॉलो करतात. एकूणच, हरिसाल गावाच्या डिजीटलचं वास्तव राज ठाकरेंनी मांडल्यानंतर भाजपकडून तो खोटा ठरवण्याचा केलेला प्रयत्न हाच मुळात किती तकलादू आहे, हेच या फॅक्टचेकमधून समोर आलं आहे.

गावातल्या इतर डिजीटल सुविधांबाबतही ग्रामस्थांमध्ये अजूनही साक्षरता आलेली नाही. त्यातच सोशल मीडियासारखी प्राथमिक माध्यम वापरबाबतही ग्रामस्थ फारसे सक्रिय नाहीत. यासर्व फॅक्टचेकमधून हरिसाल हे प्रत्यक्षात सर्वार्थानं डिजीटल होण्याआधीच सरकारनं त्याचा मोठ्याप्रमाणावर गवगवा केल्यानं त्याचं पितळ उघड पडल्याचं दिसतंय.

Similar News