नेटीझन्सहो व्यक्त व्हा पण संविधानाची पायमल्ली नको...

Update: 2019-04-30 08:16 GMT

सोशल मीडियावर राजकीय व्यक्तींवर टीका करताना नेटिझन्स अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन व्यक्त होतात. हे वारंवार दिसून आलं आहे. लोकसत्ता या वृत्तपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कुटुंबाने मतदान केल्यानंतर ‘Photos : शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या मुलीचा स्टायलिश अंदाज’ या मथळ्याची एक बातमी प्रसिद्ध केली होती. ही बातमी लोकसत्ताच्या फेसबुक पेजवर शेअर करण्य़ात आली आहे. या बातमीमध्ये विनोद तावडे यांची मुलगी अन्वीच्या फॅशनबाबत मजकूर छापण्यात आला आहे. अन्वीने वडील विनोद तावडे यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला. मात्र, यावेळी तावडे कुटुंबाच्या मतदाना पेक्षा अनेक माध्यमांनी अन्वीच्या फॅशनसेन्स बाबत वृत्त दिले आहे. या वृत्तामध्ये अन्वीचे रंगवलेले केस टोचलेले नाक, अन्वीची अनोखी फॅशन सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या फोटो याबाबत भाष्य करण्यात आलं आहे.

 

मात्र, यानिमित्ताने पुन्हा एकदा व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार घडतो आहे. अन्वीचे वडिल हे एक राजकीय व्यक्तिमत्व आहे. ते कोणत्या पक्षात आहेत अथवा त्यांच्या पक्षाची विचारधारा काय आहे, ही बाब वेगळी आहे. मात्र, अन्वीच्या स्टाईलबाबत घाणेरड्या प्रतिक्रिया सोशल मिडियावरून पोस्ट करणे हा एक स्वतंत्र अभिव्यक्ती असलेल्या एका भारतीय तरूणीवर अन्याय आहे. वास्तविक कोणत्याही व्यक्तीला मग ती पुरूष असेल अथवा स्त्री तीच्या शारिरीक व्यंगावरून लक्ष्य करणे जसे अयोग्य आहे. तसेच त्या व्यक्तीने केलेल्या पेहेरावावरून अथवा वेश आणि केशभुषेवरून तिला टीकेचं लक्ष्य करणे हे भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. एकीकडे संविधान बचावचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे आपणच संविधानाने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली करायची ही दुटप्पी भूमिका अनैतिक आणि अमान्य आहे. विशेषतः तिला ट्रोल करताना सुजात आंबेडकर यांच्यावर झालेल्या प्रतिक्रीयांचा संदर्भ अनेक नेटीझन्सनी दिला आहे. निश्चितच सुजात आंबेडकर यांच्यावरही अशा काही प्रतिक्रिया आल्या असतील तर ते अयोग्य आहे. पण म्हणून अन्वी तावडे यांच्याविरोधात घाणेरड्या प्रतिक्रिया देणे हे अतियश गैर आहे.

सदर वृत्त लोकसत्ताच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आल्यानंतर नेटिझन्सनी या वृत्तावर अतिशय घाणेरड्या पोस्ट लिहिल्या आहेत.

काय आहेत पोस्ट?

दरम्यान या पोस्टनंतर राजकीय व्यक्तींवर अशा पद्धतीने टीका करणाऱ्या पोस्टचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. नेटीझन्सनीसुद्धा प्रतिक्रिया व्यक्त करताना आपण एखाद्या व्यक्तीच्या मुलभूत अधिकारांचे हनन करीत नाही ना ? याचा विचार करणे गरजेचे आहे.

नेटीझन्सना व्यक्त होण्यासाठी सोशल मिडिया हे व्यासपीठ असले तरी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा आणि कमरेखाली वार करण्याचा अधिकार आपल्याला कुणीही दिलेला नाही, आपला राग कदाचित यंत्रणेवर, व्यवस्थेवर असेल तर तो त्याच अंगाने व्यक्त व्हायला हवा, कुणाच्याही विरोधात घाणेरड्या प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांना घटनेने दिलेल्या अधिकारांचे हनन करणा-या नसाव्यात.

 

 

Similar News