मुस्लिम समाजामध्ये अजूनही शिक्षणाचं प्रमाण कमीच आहे. त्यामुळं समस्यांच्या दृष्टचक्रात हा समाज अडकलाय. अशा परिस्थितीत मुस्लिमांचे इतर प्रश्न सोडवण्याचे शिक्षणाचे प्रश्न सोडवले तरी बऱ्याच समस्या आपोआपच सुटतील, असा आशावाद मुस्लिम समाजात शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या शिक्षिकांनी केलाय.
मॅक्स महाराष्ट्रच्या प्रतिनिधी प्रियदर्शिनी हिंगे यांनी उस्मानाबादच्या मुस्लिम महिला शिक्षकांशी ‘जनतेचा जाहीरनामा’ या कार्यक्रमात चर्चा केलीय.
उस्मानाबाद सारख्या शहरात उर्दू माध्यमाची शाळा इयत्ता १० पर्यंतच आहे. त्यामुळं १० वी नंतर मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचं गळतीचं प्रमाण जास्त आहे. त्यातही मुलींची संख्या अधिकच आहे. कारण पुढील शिक्षणासाठी पालक परिस्थिती आणि मानसिकतेमुळं मुलींना शहरापासून दूर शिक्षणासाठी पाठवत नाहीत. त्यामुळं लहान वयातच मुलींची लग्न लावून दिली जातात. अशा अल्पवयीन लग्नांमुळं मुस्लिम समाजात दारिद्रय झपाट्यानं वाढतंय, असं निरीक्षण या शिक्षिकांनी नोंदवलंय. याशिवाय उस्मानाबादच्या उर्दू शाळांमध्ये पात्र शिक्षकही मिळत नाहीत. एकूणच उर्दू माध्यमांच्या शाळांसमोरही अनेक अडचणी आहेत.