समाजातील विविध समस्यांना नेमक्या, अचूक आणि मार्मिक शब्दात मांडणाऱे शायर डॉ. राहत इंदौरी यांनी केलेल्या एका ट्विटवर नेटिझन्समधून एकानं फार मार्मिक प्रतिक्रिया दिलीय. यावेळी नेटिझन्सनं इंदौरींच्याच जुन्या शेरमध्ये बदल करून ही मार्मिक टीका केलीय.
मध्यप्रदेशमध्ये सध्या मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. मात्र, तिथल्या सततच्या भारनियमनामुळं जनता त्रस्त झालीय. शिवाय सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. प्रसिद्ध शायर डॉ. राहत इंदौरी यांनी सततच्या होणाऱ्या लोडशेडींगला कंटाळून सरकारवर निशाणा साधला आहे. राहत इंदौरी यांनी कमलनाथ सरकारवर प्रश्न उपस्थित करत ट्वीट केले आहे की, मध्यप्रदेशच्या वीज विभागातील कुणीही प्रतिसाद देत नाहीये, मागील तीन तासांपासून वीज भारनियमन सुरू आहे. तुम्हीच काहीतरी मदत करा अशा संदेशाच ट्विट करतांना डॉ. इंदौरी यांनी कमलनाथ यांनाही टॅग केलंय.
डॉ. राहत इंदौरींनी ट्विट केले आहे की, आजकाल वीज जाणं हे नेहमीचच झालंय. आज पण तीन तासांपासून वीज नाहीये. उन्हाळा आहे, रमजानही सुरु आहे. इंदौरच्या वीज कार्यालयातही कोणी फोन उचलत नाही. मात्र कमलनाथ यांच्याकडून किंवा त्यांच्या सरकारमधील कुणीही डॉ. इंदौरी यांच्या ट्विटला प्रतिसाद दिलेला नाही. ‘सरहद पे इतना तनाव क्यूँ है, जरा पता तो करो, कोई चुनाव है क्या’ हा डॉ. राहत इंदौरी यांचा शेर प्रसिद्ध आहे. याच शेरचा वापर करून moronhumor या ट्विटर अकाऊंटवरून इंदौरींच्या त्या ट्विटवर एका नेटिझन्सनं दिलेली प्रतिक्रिया - ‘प्रदेश मे बहुत अंधकार है क्या, कुछ पता तो करो, वहाँ काँग्रेस की सरकार है क्या’