जळगाव जिल्ह्यातील राजकारणात मोठया घडामोडी होताना दिसत आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तब्बल 750 कोटी रूपयांच्या घरकुल घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे आता माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह जळगाव जिल्हा बँकेतील तत्कालीन संचालकांची चौकशी होणार आहे. या एसआयटीमध्ये 10 जणांचा समावेश असणार आहे.
यावेळी या प्रकरणांमध्ये सुरेश जैन यांना क्लिन चीट देणाऱ्या तपास अधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना देखील न्यायालयानं धारेवर धरलं.
बँकेनं कृषिधन कॅटेल फीड, खान्देश बिल्डर , जैन इरिगेशनशी संबंधित इसीपी कंपनीला बेकायदेशीर कर्ज दिल्याची तक्रार दिवंगत नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी दिली होती. त्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता. या प्रकरणात जिल्हा बँकेत एका अर्जावर 270 कोटीचं कर्ज देणे, विमानतळ घोटाळा, वाघूर पाणी पुरवठा योजना यामध्ये 750 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास न करता क्लीन चिट दिली गेल्याने या प्रकरणाचा पुन्हा तपास व्हावा अशी याचिका विजय पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने 10 जणांची SIT स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.