दानवेंचं वादग्रस्त वक्तव्यं : मुख्य प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्यासाठीच

Update: 2019-04-06 06:20 GMT

एखाद्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष कसा असू नये, याचं उत्तम उदाहरण म्हणजे सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे यांचं नाव घेता येईल. सातत्यानं वादग्रस्त वक्तव्यं करून दानवे टीकेचे धनी होतात. वारंवार देशातील सैनिकांचा अपमान करणाऱ्या दानवेंच्या या चुकीमुळं भाजपनं देशाची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलीय. दानवेंची वादग्रस्त वक्तव्यं ही मुख्य प्रश्नांकडून सामान्यांचं लक्ष विचलित करण्यासाठीच असल्याचा गंभीर आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची वादग्रस्त विधानांची मालिका काही थांबताना दिसत नाही. जालना लोकसभा मतदारसंघातील रामनगर (औरंगाबाद) येथे दानवे यांनी पुन्हा एकदा आपल्या देशाचे 42 अतिरेकी मारले गेल्याचा पुनरुच्चार केला. दानवे हे प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. उद्घाटनानंतर दानवेंनी पुलवामाच्या वादग्रस्त वक्तव्याचा पुनरूच्चार केला. रावसाहेब दानवेंनी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांचा पुन्हा एकदा दहशतवादी म्हणून उल्लेख केला आहे. त्यामुळे रावसाहेब दानवेंना दहशतवादी आणि जवान यातील फरकच समजत नाही काय, असाही प्रश्न समोर येतो आहे. त्यामुळं मोदीजी, दानवेंना सैनिक आणि दहशतवादी यातील फरक समजावून सांगा, अशी मागणीच नेटिझन्सनी सोशल मीडियातून करायला सुरूवात केलीय.

भाजपनं देशाची माफी मागावी – नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

भाजपच्या नेत्यांकडून देशातील सैनिकांचा अशा पद्धतीनं वारंवार अपमान केला जातोय, त्यामुळं भाजपनं देशाची माफी मागावी. देशातल्या मुख्य मुद्द्याकडून लक्ष विचलित करण्यासाठीही ही वक्तव्यं केली जात आहेत.

Similar News