खासगी दूध व्यावसायिकांनी गायीच्या दुधाच्या किंमतीत २ रुपयांनी वाढ केल्यानंतर जिल्हा दूध उत्पादक संघ आणि उर्वरीत खासगी व्यावसायिकांनी गाईच्या दुधात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या सभेत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला आहे. ८ जून पासून हे दर लागू होणार आहेत.
साधारणपणे सध्या गायीच्या दूधाला ग्रामीण फॅट प्रमाणे दर दिला जातो. दरम्यान गाईच्या दूधाच्या दरात वाढ करण्यात आली असली तरी म्हशीच्या दुधाच्या दरात कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही.
दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कात्रज येथील पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या सभागृहात बैठक पार पडली. या दूध संघाचे राज्यभरात ११० सदस्य आहेत. या बैठकीला संघाच्या पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, शिवामृतचे धैर्यशील मोहिते, ऊर्जा दूध संघाचे प्रकाश कुतवळ, सोनाई दूध संघाचे अध्यक्ष दशरथ माने यांच्यासह दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष गोपाळराव म्हस्के या वेळी उपस्थित होते.
दरम्यान, कात्रजच्या दूध दरवाढीचा निर्णय २५ जूनला होणार आहे. या संदर्भात २५ जूनला बैठक घेतली जाणार असून या बैठकीत हा निर्णय घेतला जाणार आहे.
राज्यातील दुष्काळी स्थिती, पशूखाद्याचे वाढलेले दर, डिझेलमधील दरवाढीमुळे वाहतुक खर्चात झालेली वाढ याचा विचार करुन सरकारने पुढील तीन महिन्यांसाठी दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे. अशी मागणी या बैठकीत सरकारला करण्यात आली.