२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामध्ये आक्रमक जाहिराती, सोशल मीडियाचा पुरेपुर वापर आणि त्यातील सातत्याचाही मोठा वाटा होता. मात्र, आता २०१९ च्या निवडणुकीच्या प्रचारात प्रसिद्धीच्या बाबतीत तोच भाजप बॅकफूटवर असल्याचं दिसतंय. वर्तमानपत्रांची पहिली पानं ही काँग्रेसच्या जाहिरातींनी व्यापून टाकत काँग्रेसनं जाहिरातीमध्ये आघाडी घेतल्याचं दिसतंय. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जवळपास सर्वच वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर भाजपच्या जाहिरातींना स्थान मिळालं होतं. मात्र, २०१९ मध्ये सर्वच वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर काँग्रेसच्या तर आतील पानांवर भाजपच्या जाहिराती दिसत आहेत.
काँग्रेसनं आपल्या जाहिरातींमध्ये जाहीरनाम्यातील ठळक मुद्द्यांना स्थान दिलेलं आहे. तर भाजपनं जाहिरातींमध्ये काँग्रेसनं काय चूका केल्या होत्या, काँग्रेसची धोरणं कशी चूकीची होती हेच जाहिरातींमधून सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं काँग्रेसनं आपला स्वतःचा अजेंडा पुढे रेटत भाजपला आपल्या अजेंड्यावर आणलंय, हे यातून अधोरेखित होतंय. भाजपनं स्वतःची रणनीती राबवण्याऐवजी, स्वतःच्या जाहिराती आक्रमकपणे पुढे आणण्याऐवजी काँग्रेसनं जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं खोडून काढण्यामध्येच शक्ती वाया घालवली असल्याचं दिसतंय.