औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथील रामेश्वर हरीभाऊ भुसारी या शेतकऱ्याला २३ मार्च २०१७ ला मंत्र्यालयातील सहाव्या मजल्यावर सुरक्षारक्षकानी मारहाण केल्याची घटना घडली होती. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी आलेल्या भुसारी यांना दोन वर्ष उलटून ही मोबदला न मिळाल्याने मारहाण करण्यात आलेल्या रामेश्वर भुसारी यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे.
गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील रामेश्वर भुसारी यांनी वारंवार शासकीय कार्यालयाच्या चकरा मारून सुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही. म्हणून २३ मार्चला मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, यावेळी भुसारी यांना सुरक्षारक्षकांनी मारहाण करत पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात डांबून ठेवले.
भुसारी यांना मारहाणीचा मुद्दा माध्यमांची हेडलाईन बनली होती. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारपरिषद घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले. राजकीय नेत्यांनी यावेळी भुसारी यांच्यावर अक्षरश: अश्वासनाचा पाऊस पाडला. मात्र २ वर्ष उलटून ही त्यांना एक रुपयाची मदत मिळाली नाही. त्यामुळे हतबल झालेल्या रामेश्वर भुसारी यांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
रामेश्वर भुसारी यांना याबाबत विचारलं असता, दोन वर्षापूर्वी मंत्रालयात नुकसानभरपाईची मागणीसाठी गेलो असता, मला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर मला गृह राज्य मंत्री रंजित पाटील व राजकीय नेत्यांनी मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही मला कोणतीही मदत मिळाली नाही.