लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तब्बल २७ हजार कोटी रुपये खर्च करून निवडणूक आयोगासमोर लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग मात्र, धृतराष्ट्र बनून राहिला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
ही तर लोकशाही थट्टा !
भाजपाने निवडणुकीवर केलेल्या खर्चावर चिंता व्यक्त करत सचिन सावंत म्हणाले की, निवडणुका दिवसेंदिवस खर्चिक होत आहेत हे लोकशाहीसाठी घातक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला असेल तर त्याचे मूळ हे भ्रष्टाचारच असू शकते. त्यामुळे निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेला हे आव्हानच आहे. ही लोकशाहीची थट्टाच आहे.
एवढा पैसा कोठून आला?
सेंटर फॉर मीडिया स्टडीजने लोकसभा निवडणूकीत झालेल्या खर्चाचा अहवाल जाहीर केला आहे. या निवडणुकीत तब्बल ६० हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे. यातील ४५ टक्के म्हणजेच तब्बल २७ हजार कोटी रुपये एकट्या भाजपाने खर्च केले आहेत, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा कोठून आला याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.
निवडणुकीच्या एकंदर प्रक्रियेला भाजपाने भांडवलशाही, व्यापारपद्धतीने एकाधिकारशाहीकडे नेले आहे. इतर कोणत्याही पक्षाकडे भाजपाएवढी खर्च करण्याची क्षमता नसून प्रचंड पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा नवा पायंडा भाजपाने पाडला आहे, त्यामुळे लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, असेही सावंत म्हणाले.