समस्या सगळ्यांनाच आहेत. प्रत्येकाला आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे. काही लोकांचा आवाज निदान पोहोचतो, पण काही लोक सरकार नावाच्या व्यवस्थेपासून इतके दूर आहेत की ते कुठेतरी डोंगरदऱ्यात वस्ती करून राहताहेत, हेच कोणाच्या गावी नसतं. कसल्याही मूलभूत सुविधेपासून वंचित असलेल्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तांदळेवस्तीपर्यंत पोहचणं मोठं जिकीरीचे होतं. पण मॅक्समहा राष्ट्रचा कॅमेरा पोहचतो समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत. आमचे प्रतिनिधी राज असरोंडकर यांनी तांदळेवस्तीतील ऊस तोड कामगारांचं गाऱ्हाणं सरकारसमोर मांडण्यासाठी थेट त्यांची वस्तीच गाठली. पाहुया हा वस्ती रिपोर्ट…
बीड जिल्ह्यातील केज तालुका हा सर्वाधिक ऊसतोडणी कामगार पुरवणारा तालुका आहे. तालुक्यातील डोंगरदऱ्यांमध्ये ऊसतोडणी कामगारांच्या वस्त्या आहेत. त्यापैकीच तांदळेवस्तीला मॅक्स महाराष्ट्रच्या टीमनं आज भेट दिली. तांदळेवस्ती म्हणजे समस्यांचं माहेरघर. रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा तर इथं नाहीतच. शिवाय शिक्षण, आरोग्य, रोजगारांच्या सुविधा कित्येक मैल दूरच आहेत. साधारणपणे २० वर्षांपूर्वी ही वस्ती इथं वसलेली आहे. तरनळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत ही वस्ती येते. विकास काय असतो, याचा मागमूसही या गावाला नाही.
वस्तीवरच्या ग्रामस्थांनीच रस्ता बांधायला घेतला
तरनळी ग्रामपंचायतीकडून तांदळेवस्तीचा विकास करतांना दुजाभाव केला जात असल्याचा थेट आरोपच वस्तीवरील ग्रामस्थांनी केलाय. वस्तीवर पोहोचण्यासाठी वारंवार मागणी आणि पाठपुरावा करूनही कारवाईचं होत नाही. त्यामुळं ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्वखर्चातून रस्ता बांधायला घेतलाय. पैसे नसल्यानं तो ही अर्धवट अवस्थेतच आहे. पावसाळ्यामध्ये तर इथल्या ग्रामस्थांची आबाळच होते. कारण रस्ते नसल्यानं गावात एसटी बस येत नाही. त्यामुळं दुचाकीचाच इथल्या लोकांना मोठा आधार आहे. आठवड्यातून क्वचितच इथं खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या येतात. त्यातही तीन-चार किलोमीटर पर्यंत त्या गाड्यातून प्रवास करून पुन्हा चालत वस्तीपर्यंत यावं लागतं. पावसाळ्यात तर दुचाकीही या रस्त्यांवरून चालवणं अवघड असतंं. ग्रामपंचायतीकडून सातत्यानं विकासामध्ये डावललं जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
वस्तीचं अर्थकारण
शंभर टक्के ऊसतोडणी कामगारांच्या तांदळेवस्तीतल्या लोकांचा उदरनिर्वाह हा संपूर्णतः ऊसतोडणीच्या कामावरच अवलंबून असतो. मुळात बीड हा दुष्काळी जिल्हा आहे. त्यामुळं पावसावरच आधारित शेती इथं केली जाते. वर्षातले ५ महिने ग्रामस्थ सहकुटुंब ऊसतोडणीच्या कामासाठी गावाबाहेर कर्नाटक किंवा महाराष्ट्राच्या इतर भागात स्थलांतरित होतात. त्या पाच महिन्यांच्या ऊसतोडणीतून मिळणाऱ्या पैशावरच त्यांना वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. या कष्टाच्या कामांमुळं त्यांना अनेक आजारही जडतात. स्थानिक भागात रोजगाराच्या संधीच नसल्यानं दुर्देवानं इतर ठिकाणी स्थलांतरित व्हावं लागतं. ऊसतोडणी कामगार हा कलंक पुसायची ग्रामस्थांची इच्छा आहे. मात्र, रोजगाराचे पर्याय नसल्यानं पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडणीशिवाय पर्याय नसल्याची खंत ऊसतोडणी कामगारांनी व्यक्त केलीय.
ऊसतोडणी कामगारांच्या मुलांचंही भवितव्य अधांतरीच
तांदळेवस्ती इथं इयत्ता चौथीपर्यंत वस्ती शाळा आहे. त्यामुळं नाही म्हणायला शाळा आहे, पण तिच्या शैक्षणिक दर्जाबाबत शंका आहे. कारण आमच्या टीमनं इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीला लिहायला, वाचायला येतं का, असा प्रश्न विचारल्यावर तिनं दिलेलं नकारार्थी उत्तर बरंच काही सांगून जातं. शिवाय ५ महिन्यांच्या स्थलांतराच्या काळात ऊसतोडणी कामगारांच्या मुलांचं होणारं शैक्षणिक नुकसान हे कधीच न भरून निघणार आहे. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी स्थलांतराच्या ठिकाणी साखरशाळा होत्या, त्याही बंद झालेल्या आहेत. त्यामुळं हे ५ महिन्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान कधीही न भरून निघणारं आहे.
काय पाहिजे ग्रामस्थांना
इथल्या ग्रामस्थांना डिजीटल इंडियाच्या संकल्पनेतलं गाव नकोय. त्यांना रस्ते, वीज, आरोग्य, रोजगाराच्या संधी हव्या आहेत. २० वर्षे वाट बघून अखेर ग्रामस्थांनीच रस्ता बांधायला घेतलाय. तर गावात दोन वर्षांंपूर्वी वीज देण्याचं मान्य करण्यात आलं. त्यासाठी कंत्राटही निघालं. संंबंधित कंत्राटदारानं वस्तीपर्यंत वीजेचे खांब उभे केले आहेत. मात्र, दीड वर्ष झालं तरी अजून इथं वीज जोडणी झालेली नाही. अचानक वस्तीवरील कुणाची तब्येत बिघडली तर बैलगाडी किंवा चादरीमध्ये गु्ंडाळूनच ग्रामस्थ त्यांना पायपीट करत चार किलोमीटर अंतरावरील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेतात, ही वस्तुस्थिती आहे. सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरूय. त्याचा गंधही इथल्या ग्रामस्थांना नाहीये. पाच वर्षांतून एकदा मतं मागायला मात्र सर्वपक्षीय नेते वस्तीवर येतात, आश्वासन देतात आणि निघून जातात ते पाच वर्षांनी पुन्हा मतं मागायलाच येतात. हेच गेल्या वीस वर्षांपासून तांदळेवस्तीच्या ग्रामस्थांनी अनुभवलंय…