विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मुलानं भाजपच्या तिकिटावर निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासूनच विखे-पाटील काँग्रेसच्या निर्णयप्रक्रियेतून दूर व्हायला सुरूवात झाली. याचा प्रत्यय आज काँग्रेसच्या पत्रकार परिषदेतही आला.
मुंबईतल्या दादर इथल्या टिळकभवनमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यात महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उपस्थित होते. तर याच नेत्यांच्या रांगेत एका कोपऱ्याला विखे-पाटील बसले होते. डॉ. सुजय यांच्या भाजपप्रवेशानंतर विखे-पाटील हे काँग्रेसच्या काही बैठकांना गैरहजर राहिले होते. मात्र, या बैठकीला विखे-पाटील उपस्थित होते. परंतू, एकूण निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग फारसा दिसला नाही. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काही वेळ बसल्यानंतर विखे-पाटलांनी काढता पाय घेतला.
अशोकराव विखे-पाटील प्रकरणावर गप्पच !
भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यासाठी काँग्रेसचे काही कार्यकर्ते प्रचारात उतरले आहेत. यासंदर्भात अशोक चव्हाण यांना पत्रकारांनी वारंवार विचारणा केली. मात्र, एक शब्दही अशोक चव्हाण बोलले नाहीत.
संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड काँग्रेसमध्ये
संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळं पुणे लोकसभेतून गायकवाड यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.