ऐ, लाव रे तो व्हिडीओ, मुंबईत ऐकू येणार का ?

Update: 2019-04-20 17:00 GMT

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यभरात सभा घेत भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. मात्र, येत्या २४ एप्रिलची राज यांची मुंबईतली सभा होईल की नाही, याविषयी उत्सुकता निर्माण झालीय. कारण राज यांच्या मुंबईतल्या सभेला निवडणूक आयोगानं परवानगी नाकारली आहे. मुंबईतल्या राज यांच्या सभेला मनपानंही परवानगी नाकारली आहे. मात्र, राज ठाकरेंच्या सभांना परवानग्या नाकारण्यात आल्या तरी सभा घेण्यावर मनसे ठाम आहे.

मनसेनं यंदाच्या लोकसभा निवडणूकीत न उतरण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं मनसेच्या भूमिकेविषयी चर्चा सुरू झाली होती. त्यावर राज यांनी भाजप सरकारविरोधात राज्यभर सभा घेणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. त्यानुसार १२ एप्रिलपासूनच राज यांनी राज्यभर सभांचा धडाका लावला. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची फसवणूक केल्याचं सिद्ध करण्यासाठी राज यांनी ऐ, लाव रे तो व्हिडीओ म्हणत व्हिडीओ चित्रफितीतून सरकारी दाव्यांची पोलखोल करायला सुरूवात केली.

24 एप्रिलला मुंबईतील शिवडी येथे राज ठाकरेंच्या सभेचं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र, अजूनही मनसेच्या सभेला परवानगी मिळालेली नाही. मनसेचा उमेदवार उभा नसल्याने परवानगी देता येणार नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. तर, दुसरीकडे महानगर पालिकाही परवानगी नाकारत आहे. शिवडीच्या नरे पार्क आणि भगतसिंग मैदानावर सभेसाठी मनसेनं परवानगी मागितली होती. यावेळी सारख्याच मैदानाकरिता अरविंद सावंत यांनी या मैदानाची मागणी केली आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनसेनंही सभा घेणारच अशी भूमिका घेतलीय.

https://youtu.be/UdSzUAtGLOI?t=2

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Similar News