नितेश राणेंचे अटकनाट्य, तुरुगांतला फोटो आणि डिलीट केलेलं अमित शहाचं ट्विट
नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणारे भाजपचे आमदार नितेश राणे अटकेनंतरही चर्चेत आहेत. समय बहुत बलवान होता है असं सांगत त्यांनी ट्विट केललं अमित शहांचा फोटो पक्षादेशानं डिलीट करावा लागला असून आता पोलिस कोठडीतील व्हायरल फोटो देखील पाच वर्ष जुना असल्याचं सांगितलं जात आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी तपासासाठी पोलिस नितेश राणेंना पुण्याला नेण्याच्या तयारीत असल्याचं समजतयं.
नितेश राणे यांना बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर नितेश राणे यांची रवानगी सावंतवाडी येथील कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी नितेश राणे यांना कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले. याठिकाणी राकेश परब आणि नितेश राणे यांची चौकशी होणार असल्याचे वृत्त आहे.
पोलीस पुढील तपासासाठी नितेश राणे यांना पुण्यात नेऊ शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे. संतोष परब यांच्यावरहील हल्ल्याचा कट हा पुण्यात शिजल्याची माहिती आहे. त्यामुळे नितेश राणे यांना तपासासाठी प्रत्यक्ष घटनास्थळी नेण्यात येईल अशी शक्यता आहे.
दरम्यान अटकेनंतर नितेश राणे यांनी ट्विट करुन २००९ मध्ये पी. चिदंबरम गृहमंत्री असताना अमित शहा यांना अटक केल्याची घटना सांगितली होती. तर १० वर्षांनंतर अमित शहा गृहमंत्री असताना पी. चिदंबरम यांना अटक केले होते असेही सांगितले होते. त्यासोबत "समय बडा बलवान होता है, इन्सान खामो खा गुरुर करता है" असे कॅप्शन लिहित शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या इशारा दिला होता.त्यांनी अमित शहांचा अटक झालेला फोटो ट्विट केला होता. मात्र आता हाच फोटो त्यांना महागात पडल्याची चर्चा आहे. नितेश राणे यांनी हे ट्विट आता डिलीट केले आहे. त्यांना पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरुनच तशा सुचना आल्याचे सांगितले जात आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1488804496595898373
अमित शहाचं ट्विट डिलीट केल्यानंतर सोशल मीडियावर नितेश राणे यांना तुरुंगात बसून पुस्तक वाचतानाचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे. या छायाचित्रात तुरुंगातील कोठडीचे लोखंडी गज आणि त्यापलीकडे बसलेले नितेश राणे दिसत आहेत. त्यामुळे संतोष परब हल्लाप्रकरणात अटक होण्यापूर्वी अज्ञातवासात गेलेले नितेश राणे तुरुंगात आल्यानंतर इतके निवांत कसे, असा प्रश्न विचारला जात होता. परंतू व्हायरल झाल्यानंतर काहीवेळातच या छायाचित्रामागील खऱ्या कहाणीचा उलगडा झाला. हे नितेश राणे यांचेच छायाचित्र आहे, परंतू ते पाच वर्षांपूर्वीचे आहे. पाच वर्षांपूर्वी नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वाळूच्या प्रश्नावरुन राडा केला होता. त्यावेळी नितेश राणे यांना अटक झाली होती. तेव्हा नितेश राणे यांचे हे छायाचित्र टिपण्यात आले होते.
आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. आता या प्रकरणात कणकवली पोलिसांकडून आणखी एक अनपेक्षित निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र, पोलिसांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
परंतु, आता पोलिसांनी नितेश राणे यांना पुण्यात नेल्यास याप्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप नेत्यांनी गुरुवारी सकाळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी भाजप नेत्यांनी पोलिसांविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. नितेश राणे यांच्यावर राजकीय हेतूने कारवाई केली जात आहे. पोलीस दबावाखाली आहेत. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाबाहेर ज्याप्रकारे नितेश राणे यांची गाडी अडवण्यात आली आणि निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, तो प्रकार चुकीचा आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली. पोलीस अधीक्षक वरुन येणाऱ्या आदेशांप्रमाणे कारवाई करत आहेत. या माध्यमातून हेतूपूर्वक वातावरण बिघडवले जात आहे. अशाने लोकांमध्ये असंतोषाचा भडका उडायला वेळ लागणार नाही. आम्ही पोलिसांविरुद्ध रस्त्यावर उतरु. सरकार येईल आणि जाईल, पण कायदा सर्वांसाठी समान असतो, हे लक्षात ठेवावे, असे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी म्हटले.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही नितेश राणेंना पाठींबा दिला आहे.
कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी,
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) February 3, 2022
सदियों रहा है दुश्मन दौर-ए-ज़माँ हमारा...@NiteshNRane pic.twitter.com/OVPH4gQVFB
नितेश राणे यांचे खाजगी सचिव राकेश परब हे देखील कणकवली पोलिसांच्या ताब्यात आहेत. यावेळी नितेश राणे आणि राकेश परब यांची कणकवली पोलिस स्वतंत्र चौकशी करत आहेत. नितेश राणे यांचे शिवसैनिक संतोष परब खुणी हल्ल्यातील मुख्य आरोपी पुणे येथील सचिन सातपुते याच्यासोबत राकेश परबच्या मोबाईल वरून संभाषण झाले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. राकेश परब यांच्या मोबाईलवर सचिन सातपुते यांचे एकूण ३८ कॉल आढळून आले आहेत. पोलीस तपासात ही बाब निष्पन्न झाल्यानंतर राकेश परब यांच्या मोबाईल वरून नितेश राणे यांचे सातपुते याच्यासोबत संभाषण झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबतचा तपास कणकवली पोलिस या दोघांचाही स्वतंत्र बसवून करत आहेत. यावेळी जे बोलणे झाले ते नेमके कोणत्या मोबाईलवरून झाले याची चौकशी देखील यावेळी करण्यात येत आहे.
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात अटकेत असलेले भाजप आमदार नितेश राणे हे 'सुपारीबाज' आमदार असल्याचा खळबळजनक आरोप सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला आहे. ते कणकवली येथे बोलत होते. नितेश राणे यांनी सातपुते याला सुपारी देऊनच शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला घडवून आणल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळेच त्यांना पोलीस कोठडीत जावे लागले, असेही ते म्हणाले. नितेश राणे यांच्या 'समय बलवान है' या ट्वीटवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. राणे यांचे बरोबर आहे. समय बलवान होता म्हणून योग्य वेळी योग्य वेळेने साथ दिली. म्हणून तुम्हाला पोलीस कोठडीत जावे लागले. यामुळे समय बलवान आहे हे त्यांचे वाक्य तंतोतंत बरोबर आहे, असा टोला सावंत यांनी लगावला.