सचिन तेंडुलकरचे देशप्रेम?

पॉप गायिका रिहानाने दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट केल्यानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर जागा झाला आणि त्याने रिहानाला उद्देशून ‛भारतात काय सुरु आहे त्याबद्दल आम्ही बघून घेऊ, बाहेरच्यांनी त्यात नाक खुपसू नये' असे प्रत्युत्तर दिले आहे. एवढ्यावरुन भक्तांनी तेंडुलकरला डोक्यावर घेतले आहे, यावर सांगतायेत अनिल माने...

Update: 2021-02-04 07:44 GMT

गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनावर या तेंडुलकरने साधा शब्दही काढला नाही, पण बाहेरचं कुणी या आंदोलनावर बोललं की आमचा देश सार्वभौम आहे, आमचं आम्ही बघुन घेऊ असे जागतिक पातळीवरचे सल्ले देत आहे. बरं ह्या महाशयांना कुणी त्यांचं मत विचारलंय का ? किंवा हे ट्विट करुन सचिनला बीसीसीआयच्या विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबईच्या संभाव्य खेळाडूंमध्ये अर्जुन तेंडुलकरचा समावेश केल्याबद्दल सचिव जय अमित शहांचे आभार तर मानायचे नसतील ?

कदाचित सचिनच्या भक्तांना राग येईल, पण सचिनच्या देशप्रेमाबद्दल आम्हालाही बोलावं लागेल.

१) सर डॉन ब्रॅडमन यांचा शतकांचा विक्रम मोडल्याबद्दल २००२ मध्ये फियाट इंडियाने फॉर्म्युला वन रेसर मायकल शुमाकर याच्या हस्ते सचिनला फेरारी कार गिफ्ट दिली होती. ती कार भारतात आणण्यासाठी सचिनला एक कोटी रुपयांहून अधिक कस्टम ड्युटी भरावी लागत होती. पण या पठ्ठ्याने कस्टम ड्युटी भरण्यास चक्क नकार दिला. जीवनावश्यक औषधांनाही कस्टम ड्युटी माफ नसते. फुकट मिळालेल्या कारसाठी हा व्यक्ती आपली कस्टम ड्युटी माफ करा म्हणुन तत्कालीन भाजप सरकारचे केंद्रीय मंत्री प्रमोद महाजनांना पत्र लिहतो आणि २००३ मध्ये सचिनच्या १०० व्या कसोटी सामन्यादिवशी सरकारकडून त्याला भेट म्हणून करमाफी दिली जाते हे देशाने बघितलं आहे. यावर प्रसिद्ध कार्टुनिस्ट आरके लक्ष्मण यांनी एक कार्टून काढून मार्मिक अशी टीका केली होती. भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कपिल देव यांनीही सरकारच्या या तोंड बघून घेतलेल्या निर्णयावर टीका केली होती. शेवटी फियाट इंडियानेच ही कस्टम ड्युटी भरली आणि २०११ साली सचिनने तीच कार जयेश देसाई नावाच्या सुरतच्या एका व्यापाऱ्याला विकली.

२) २०१० साली BMW M5 लक्झरी कारवरती असणारा १ लाख रुपये सेस न भरल्याबद्दल नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनने तेंडुलकरचा समावेश करबुडव्यांच्या यादीत केला होता.

३) २०१४ साली मुंबई महानगर पालिकेने जाहीर केलेल्या पाणीबिल थकबाकीदारांच्या यादीत थकबाकीदार म्हणून महानगरपालिकेच्याच जाहिरातीतून "पाणी वाचवा" असा संदेश देणाऱ्या सचिन तेंडुलकरचे नाव होते.

४) सचिन भक्तांच्या माहितीसाठी तर सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्याला तुम्ही क्रिकेटचा देव, वगैरे उपमा लावता तो देव केवळ क्रिकेटच्या जीवावर मिळालेल्या जाहिराती आणि जाहिरातीतून मिळालेल्या अफाट पैशांवरील टॅक्स कमी करण्यासाठी स्वतःला क्रिकेटपटू ऐवजी अभिनेता म्हणवून घ्यायलाही मागेपुढे पाहत नाही. २०११ साली सचिन तेंडुलकर विरुद्ध असिस्टंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स या केसमध्ये सचिनने आयकर अपील न्यायाधिकरणाकडे आपली बाजू मांडताना असे सांगितले की अभिनय आणि मॉडेलिंग हाच माझा मुख्य व्यवसाय आहे आणि मी व्यावसायिक क्रिकेटर नाही. बीसीसीआयसाठी क्रिकेट खेळल्याबद्दल मला जे उत्पन्न मिळते ते माझ्या "उत्पन्नाच्चे इतर स्रोत" यामध्ये समाविष्ट होतात. जर मला अभिनेता म्हणुन करमाफी दिली जाणार नसेल तर मला आर्टिस्ट म्हणून गणले जावे कारण मी एक सार्वजनिक कलाकार आहे. स्वतःला क्रिकेटर ऐवजी आर्टिस्ट सिद्ध करुन सचिनने जवळपास पावणे दोन कोटी रुपयांहून अधिक करकपात मिळवून घेतली. शोकांतिका आणि विरोधाभास असा की याच सचिन तेंडुलकरला क्रिकेट खेळला म्हणून भारतरत्न पुरस्कार देण्यात येतो.

आता काही भक्त सचिनच्या दानशूरतेची उदाहरणे घेऊन येतील, सचिनने ह्यांव केलं त्यांव केलं म्हणतील. पण शेतकऱ्यांसाठी सचिनने कधी एक चकार शब्द काढलाय का हे नाही सांगणार.

Tags:    

Similar News