परतीच्या पावसाने खरिपाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. द्राक्ष बागांसह मका, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कडधान्य, कांदा आदी पिकांचे कोटय़वधींचे नुकसान आतापर्यंत झाले आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने पीक चांगले बहरले. यामुळे दिवाळी उत्साहात साजरी होईल, अशी स्थिती असताना परतीच्या पावसाने सारे काही उद्ध्वस्त केले. कोणतेही पीक त्यातून वाचले नाही. सततच्या पावसाने शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे आमदार शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करत मदत मिळवून देण्याचे आश्वासन देत आहेत. रविकांत तुपकर यांनी थेट शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
यावेळी प्रचंड नारेबाजी करत निदर्शने करण्यात आली. रविकांत तुपकर यांनी आक्रमक पावित्रा घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात जाण्याची भूमिका घेतल्याने पोलिसांनी त्यांना अडविले. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तुपकरांसह कार्यकर्त्यांना अटक केली.
दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मध्यस्थी केल्यामुळे रविकांत तुपकर यांच्यासह एका शिष्टमंडळाला पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचविले. यावेळी तुपकरांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. या आंदोलनाने प्रशासन पुरते हादरले होते.
ओला दुष्काळ जाहीर करावा, पंचनाम्याचे नाटक बंद करुन शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी,पिकविम्याची रक्कम तातडीने करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात ३१ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राडा आंदोलन करण्यात आले. रविकांत तुपकरांसह कार्यकर्ते नुकसान झालेली पिके घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. दरम्यान स्वाभिमानीच्या आंदोलन सुरु असताना जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे सिंदखेड राजा तालुक्यात पाहणी दौऱ्यासाठी निघाल्या होत्या. रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशीच चर्चा करण्याचा आग्रह धरत आक्रमक भूमिका घेतल्याने पोलीस आणि तुपकरांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. भुजबळ पाटील यांनी मध्यस्थी करत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. स्वाभिमानी'ची आक्रमक भूमिका पाहता जिल्हाधिकारी दौऱ्यावर निघालेल्या असतानाही त्यांना मध्येच परत यावे लागले.