अकोले, अहमदनगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं. तसंच राज्यात कोल्हापूर व सांगलीतही आंदोलन करण्यात आलं. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मंगळवार पासून दूध बंद आंदोलन पुकारले आहे.
आज गावोगावी दूध संकलन केंद्रावर दगडाला दुधाचा अभिषेक करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात येत आहे. जिल्हा तालुका स्तरावर प्रतिकात्मक आंदोलन करून जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन आणि दूध पिशवीची भेट दिली जात आहे. जर या मागणीकडे गंभीरपणे लक्ष दिले नाहीतर 1 ऑगस्टला तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शेतकरी संघटनांनी केला आहे.
दुधाला 30 रुपये भाव द्या. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी दगडाला दुधाचा अभिषेक घालून केंद्र व राज्य सरकारचा शेतकऱ्यांनी निषेध केला.
दूध उत्पादकांना किमान दहा रुपये अनुदान द्यावे, दुधाला भाव द्यावा, यासह विवीध मागण्यांसाठी शिवसंग्राम, भाजप आणि महायुतीचे घटकपक्ष यांच्या माध्यमातून राज्यभर आज केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला जात आहे.
काय आहेत आंदोलकांच्या मागण्या...?
दुधाला प्रति लीटर 30 रुपये दर द्या.
केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तात्काळ मागे घ्या.
दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 10 रुपये अनुदान वर्ग करा.