महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारांचे राज्य म्हटले जाते. या राज्यात आता शेतकऱ्यांपाठोपाठ शिक्षकही आत्महत्या करू लागलेत. स्वत:ला प्रगत, शैक्षणिक राज्य म्हणून मिरविणाऱ्या शासनाच्या निर्णय घेण्याच्या दिरंगाईमुळे डिसेंबर महिन्यात बुलढाणा जिल्हयातील संगणक शिक्षक रतन जाधव यांनी निराशेपोटी आत्महत्या केली. दोन महिन्यांनी वाशिम जिल्ह्यातील मयुर बोंटे या संगणक शिक्षकाने 3 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. सरकार अजून किती शिक्षकांचे बळी घेवून त्यांना न्याय देणार? महाराष्ट्र सरकार डिजीटल महाराष्ट्राच्या गप्पा जाहिरातीतून करत आहे. डिजीटल महाराष्ट्र, डिजीटल इंडिया घडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करनाऱ्या संगणक शिक्षकांना बेरोजगार करून खरंच शाळा, महाराष्ट्र डिजीटल होईल का? केंद्र सरकार पुरस्कृत (माहिती संप्रेषण तंत्रज्ञान) योजनेअंतर्गत राज्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत कंत्राटी संगणक शिक्षकांना इतर राज्यातल्या शिक्षकांप्रमाणे कायम करावे ही मागणी घेवून वेळोवेळी आंदोलने, उपोषणे करण्यात आली. नागपूर अधिवेशनात काढलेल्या मोर्च्यात या शिक्षकांवर लाठीचार्ज करण्यात आला. या वेळी गर्भवती महिला शिक्षिकाही जखमी झाल्या. आतापर्यंत सत्ताधारी आणि विरोधक आमदार, खासदार, मंत्री या सर्वांकडे निवेदन देऊन संगणक शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे ही विनंती करण्यात आली. मात्र सर्वांकडून फक्त आश्वासनाचे गाजर मिळत गेले.
- राजेश शेषराव राठोड, जालना जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ