विद्यापीठाचे वरातीमागून घोडे, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क भरल्यानंतर फी माफ: कुलदीप आंबेकर
कोरोनाच्या काळात विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केले आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी फीज भरलेली असताना आता हे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठ ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली आहे ती फी परत करणार आहे का? स्टुडंट हेल्पींग हँडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांचा विद्यापीठाला सवाल
नेहमीच्या नैसर्गिक आपत्ती जसे दुष्काळ असो किंवा पूर परिस्थिती असो आणि आता करोनासारखे अभूतपूर्व संकट असू देत ज्या ज्या वेळी अशी नैसर्गिक आपत्ती येते. त्यावेळी सगळींकडून बोंबाबोंब झाल्यावर एक लोकप्रिय घोषणा विदयापीठ करतंय. अशीच आत्ताची घोषणा म्हणजे विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ.
परंतू वास्तविकता पाहायला गेल्यास या निर्णया मागची गोम निराळी आहे. प्रत्यक्ष याचा काहीच फायदा विद्यार्थी वर्गाला होत नाही. कारण असा निर्णय होईपर्यंत बहुतेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले असतात मग अशा विद्यार्थ्यांना शुल्क माफीचा काय फायदा ?
कारण विद्यापीठाने आजतागायत परिक्षाशुल्काच्या माफीनंतर शुल्क परताव्याबद्दल माहिती दिलेली नाहीये, किंबहुना विद्यापीठाकडे तशी माहितीच नसते. त्याचे कारण परतावा झालेलाच नाहीये. जर झालेला असेल तर विद्यापीठाने तशी माहिती जाहीर करावी. याबाबत विद्यापीठांनी खुलासा करावा.
विद्यार्थ्यांचे मौन विद्यापीठाच्या पथ्यावर:
विद्यार्थ्यांच्या तोंडाला अशी पाने पुसण्याचा कार्यक्रम विद्यापीठ वारंवार करत असते आणि विद्यार्थ्यांनी त्यावर मौन बाळगणे अथवा असे कागदोपत्री निर्णय सहन करणे. या मनमानीला खतपाणी घालत असते. अशा निर्णयाची चिकित्सा होणं गरजेचे आहे. त्यावर विद्यार्थांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे.
हे तर वरती मागून घोडे:
आता देखील करोनाच्या काळात ज्या विद्यार्थ्यांनी पालक गमावलेत त्यांना सहानभुती म्हणून परीक्षा शुल्क माफ विदयापीठ करतेय. चांगली बाब आहे पण जवळजवळ 90% विद्यार्थ्यांनी अर्ज याआधीच भरलेले आहेत. मग हा निर्णय म्हणजे "वराती मागुन घोडे" असे आहे का? निर्णय घ्यायचा होता तर मग आधीच का घेतला नाही?
विद्यापीठाला माहीत आहे की अगोदर फी भरली की परताव्यासाठी कोणी विदयार्थी विचारायला येत नाही. विद्यापीठ स्वतःहून विद्यार्थ्यांच्या खात्यावर कधीच परतावा करत नाही. त्यामुळे अशा निर्णयाचा फक्त दिखाव्यासाठी फायदा विद्यापीठांना होतो. हा विद्यार्थ्यांचा वर्षानुवर्षाचा अनुभव आहेच.
मुळातच फी भरतानाच अर्जावरती करोनाबाबत उल्लेख केला असता तर विद्यार्थ्यांनी माहीतीसह अर्ज भरला असता. असा सरळ साधा मार्ग असताना सगळं झाल्यावर निर्णय घेऊन निव्वळ विदयार्थी व पालक वर्गाच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम विद्यापीठ करत आहे.
करायचेच होते तर शैक्षणिक शुल्क संपूर्ण माफ करायचं होती ना, अडचण काय?
सध्याची परिस्थिती पाहता परीक्षा शुल्क सरसकट माफ होणे गरजेचे आहे. विदयार्थीवर्गात संभ्रम निर्माण करुन दुट्टप्पी भूमिका घेऊ नये. कोरोनामुळे सर्वांचीच अवस्था काय झालीय? याची सर्वांनाच कल्पना आहे. फक्त ऑनलाइन वर्ग घेऊन देखील विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शुल्क वसूल करणाऱ्या विद्यार्थ्यांनी निदान या तुटपुंज्या रकमा तरी विद्यापीठाने सरसकट माफ कराव्यातच. अन्यथा आपण किती कोत्या मनाचे आहात आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा खरंच किती विचार करता हे सर्वानाच कळेल.