प्राध्यापकांचे वेतन वेळेवर न देणाऱ्या शिक्षणसंस्थांवर कारवाई करणार - विनोद तावडे
राज्यातील प्राध्यापकांचे वेतन वेळेवर झाले पाहिजे. परंतु काही शिक्षणसंस्था चालक वेळेवर वेतन देत नाही अशा शिक्षणसंस्था चालकांची शासनाकडे तक्रार आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत दिली आहे.
राज्यातील अनुदानित महाविद्यालयात सुरु असलेल्या प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार होत असल्याबाबतची लक्षवेधी सूचनेत प्राध्यापकांच्या वेतनाबाबतचा उपप्रश्न आमदार सतीश चव्हाण यांनी मांडला होता, या प्रश्नाला उत्तर देताना तावडे यांनी ही माहिती दिली. या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार सर्वश्री दत्तात्रय सावंत, आमदार भाई जगताप, आमदार नागोराव गाणार यांनी सहभाग घेतला.
या संदर्भात बोलताना तावडे यांनी…
“राज्यातील संपूर्ण प्राध्यापक भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मागदर्शक सूचनांनुसार पार पाडण्यात येते. राज्यात प्राचार्य भरतीलाही परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील सर्व भरती प्रक्रिया ही भ्रष्टाचार मुक्त केली जाईल. याबाबतच्या सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित सदस्यांची लवकरच संयुक्त बैठक घेतली जाईल.”