जगाचं अर्णबायजेशन!

Update: 2020-09-09 06:10 GMT

अर्णब गोस्वामी हे नाव पहिल्यांदा ऐकलं, तेव्हाही या माणसाची भूमिका पटली नव्हतीच. पण, त्याची भाषा, शब्दसंपदा, इंग्रजीवरचं अस्खलित प्रभुत्व यामुळं अर्णबला ऐकणं शक्य तरी होतं.

त्या अर्णबचं आज जे झालं आहे, ते भयावह आहे. पत्रकारिता सोडा, कटट्यावरच्या कुचाळक्या सुरू असतानाही जे किमान संकेत असतात, त्याचंही भान त्याला नाही. आणि, अर्णब काही एकटा नाही. अशी मोठी 'सायकॉटिक' गॅंग आहे. हे सगळेजण 'टीआरपी'च्या जगाचे बादशहा आहेत. 'टीआरपी' नावाच्या गोष्टीमुळं इलेक्ट्रॉनिक मीडियातून शहाणे संपादक कालबाह्य ठरले आहेत. आणि, अशा सर्कशी करू शकणा-या संपादकांनी ती जागा घेतली आहे.

एक नवा 'माध्यमवर्ग' जन्माला आला आहे. हा वर्ग माध्यमांच्या जगात स्वतःचं जगणं मिसळून टाकतो. म्हणजे मग त्याला आपलं कंटाळवाणं आयुष्यही थरारनाट्यासारखं वाटू लागतं. कधी सुनंदा पुष्कर, कधी इंद्राणी, कधी रिया; असा तडका मिळाल्यानंतर त्याला आपल्याही जगण्यात काहीतरी हॅपनिंग आल्याचं भासू लागतं.

आज रियाच्या निमित्तानं माध्यमांचा हा भेसूर चेहरा जगासमोर येतो आहे. अर्थात, तो आजचा नाही. गेल्या काही वर्षांत हा चेहरा तयार झाला आहे. रिया दोषी असेल, व्यसनी असेल वा खुनीही असेल, पण तिच्यावर तुटून पडलेल्या या लांडग्यांचं करायचं काय? हे हिंस्त्र लांडगे असेच 'तबलिगी' च्या निमित्ताने तमाम मुस्लिमांवर तुटून पडले होते. पण, 'मॉब लिंचिंग' करणा-या दंगलखोरांबद्दल बोलण्यासाठी मात्र यांना शब्दही सापडणार नाहीत!

मीडियाच्या या अवताराला नाव देता येऊ नये, इतका हा भयंकर उन्माद आणि उच्छाद आहे. अर्णब आणि त्याच्या गॅंगला ऑफिशियली तुरूंगात डांबून ठेवावे, असे अपराध हे लोक दररोज करताहेत. आणि, तरीही 'नंबर वन न्यूज चॅनल' अशा जाहिराती करत नित्य नवा वाह्यातपणा मिरवताहेत. मुळात, 'एंड ऑफ जर्नालिझम' पर्यंत आपण येऊन ठेपलो आहोत.

हे सुरू असतानाच, तिकडं रवीशकुमार नावाचा संवेदनशील पत्रकार मात्र, थोर पत्रकारितेचे नवे विक्रम रोज प्रस्थापित करतोय. स्वातंत्र्यलढ्यातील पत्रकारिताही सामान्य भासावी, अशा असामान्य तेजाने तळपतोय. टीआरपीच्या सर्कशीत तो नंबर एक नसेलही, पण आजच्या घडीला देशातला सगळ्यात मोठा आणि प्रभावी विरोधी पक्षनेता कोण असेल, तर तो आहे रवीश. मी आणि रवीश, खरे तर एकाच वयाचे; पण रविशपुढं हजारदा नतमस्तक व्हावं, असे मापदंड त्यानं तयार केलेत.

पत्रकारितेचे सगळे आयामच बदलून टाकलेत. आजचा काळ रवीशसारख्या पत्रकारितेसाठी फारच सर्जनशील आहे. पण, एकाच सुरात ओरडण्याचा जो सामूहिक हट्ट आहे, त्यानं मीडियाचं अर्णबायझेशन केलं आहे. गल्लाभरू बाजारपेठ, आत्मघातकी राजकारण आणि बिनचेह-याची माध्यमक्रांती यांच्या आघाडीतून हे आकाराला आलं आहे. त्यामुळं, कट्टर राजकारणी आणि अट्टल धंदेवाईक यांच्यासोबत मीडियाची युती आहे.

या मीडियाचं श्रेय मोदींना देऊन चालणार नाही. उलट मोदी आल्याचं श्रेय अशा माध्यमांना दिलं पाहिजे. 'टीआरपी'ची रॅटरेस खेळणा-या मीडियाला डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असून चालत नाही. त्यांच्या वाह्यातपणाला मोदीच पूरक आहेत. या माध्यमालाच नव्हे, सोशल मीडियालाही हेच हवे आहे. स्थिर, विचारी नेतृत्व देशाला लाभले तर सोशल मीडियावरची सळसळच संपून जाईल ना!

ओबामांसारखा थिंकर प्रेसिडेंट त्यांना नको आहे. ट्रम्प हेच सोईचे आहेत. जगभर हे सुरू आहे. रशियात पुतिनला विरोध करणा-या तरूणावर सैबेरियात हल्ला झाला आणि आता तो कोमात गेला आहे. चीनचा 'सात-बारा' जिनपिंग यांनी आपल्या नावे कधीच करून घेतला आहे. म्यानमारपासून श्रीलंकेत, असे सगळीकडे हेच सुरू आहे. आणि, हे सगळेजण एकमेकांसाठी पूरक आहेत.

'कम्युनिकेशन' ही सगळ्यात मोठी बाजारपेठ झालेली असताना, विखारी विसंवादात सगळ्यांचीच गुंतवणूक आहे. जगाचं 'अर्णबायझेशन' झालेलं आहे. आणि, ही खरी चिंता आहे!

 

Similar News