निषेध 'सिलेक्टिव्ह' नको, सर्वच विकृतींचा व्हावा- हेरंब कुलकर्णी

सोशल मीडियाच्या या जगात राजकारण्यांची एकमेकांवरील टीका आणि त्यांच्या समर्थकांची टीका अत्यंत टोकदार होत चालली आहे. पण यामुळे आपण माणूस म्हणून आपला स्तरच गमावतो आहोत का, असा सवाल उपस्थित करणारे सामाजिक कार्यकर्ते हेरबं कुलकर्णी यांचे विश्लेषण...

Update: 2021-04-01 02:19 GMT

आपल्याकडे निषेधसुद्धा सोयीस्कर होत असतात. शरद पवार यांच्याविषयी नीच भाषेत पोस्ट लिहिणाऱ्यावर फक्त ब्लॉक न करता कायदेशीर कारवाई करायला हवी, कारण हे प्रकार आता समज देऊन संपत नाहीत. त्याचा आता अतिरेक झाला आहे. पवारांच्या सद्भावनेच्या लाटेत हे विकृत कुठे वाहून गेले तेही कळले नाही. १९९५ च्या निवडणुकीत सोशल मीडिया नव्हता तेव्हा पवारांच्या कुटुंबातील व्यक्तीविषयी असेच विकृत प्रचार झाले. तेव्हाही या विकृतीवर चर्चा झाली होती. ते व्यथित झाले होते.

पण हे निषेध करण्यातही पुन्हा दोन बाजू आहेत. अशी बदनामी करण्यात भाजप आयटी सेल सर्वात पुढे आहे.' घडलं बिघडलं' पेज व 'नथुराम पेज' ही दोन उदाहरणे आहेत. ही पेज मोठ्या प्रमाणात रिपोर्ट झाली तर बंद होतील. तसा प्रयत्न व्हायला हवा.(मी तो प्रयत्न केला आहे)

पण दुसरी बाजू हीसुद्धा नोंदवली पाहीजे की उजव्या बाजूच्या व्यक्तींवरही असे हल्ले होतात तर त्याचाही निषेध करायला हवा पण अनुभव वेगळा आहे. देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातात बचावले तेव्हा 'अरेरे मेला नाही का अशा विकृत पोस्ट आल्या, टरबूज नावाने पेज उघडले गेले, 'तुझी बायको मागत नाही, आरक्षण मागतो असे लिहीले गेले. तेव्हा आज पोस्ट टाकणाऱ्या किती जणांनी त्यावर लिहीले ? अशी हिंमत आक्रमक कार्यकर्ते असणाऱ्या नेत्यांच्या पत्नीविषयी करतील का? मुख्यमंत्री यांचा उल्लेख टरबूज असा होत असताना सगळे विचारी लोक गप्प होते हे वास्तव आहे. किमान असे लोक unfriend तरी केले का ? मी यावर पोस्ट टाकली तेव्हा थेट माझी नेहमीप्रमाणे जात निघाली..आयटी सेलचे उदाहरण दिले पण म्हणून आपणही त्या पातळीवर जाण्याचे समर्थन करायचे ?

हे सिलेक्टिव्ह असते का ? आज शिवसेना नेते पवारांच्या विषयावर बोलतील पण नानासाहेब गोरे यांच्या मृत्युनंतर दुसऱ्याच दिवशी ' ढोंगीपणाला श्रद्धांजली नाही' हा अग्रलेख बाळासाहेब ठाकरेंनी लिहिला. यावर किती जण तेव्हा बोलले असतील? आचार्य अत्रे व बाळासाहेब ठाकरे यांनी हे व्यक्तिगत हल्ले गतिमान केले हे वास्तव आहे.

पुन्हा उजवे समर्थकही तसेच. दीर्घ आंदोलनाने उद्विग्न होऊन राकेश टिकैत यांनी मृत्यूची भाषा केली. कोणीही संवेदनशील माणूस हलेलं पण शेफाली यांनी माझ्याकडून दोन लिटर रॉकेलं इतकी अमानवी पोस्ट टाकली..फडणवीस यांच्यावरील हल्ल्याने व्यथित होणाऱयांची प्रतिक्रिया काय ? त्या आंदोलनावर मतभेद असू शकतात पण इतक्या क्रूर अमानुष भाषेत लिहणाऱ्याविषयी भाजप समर्थक बोलणार की नाही ?

अमित शहा यांच्याविषयी व्यक्तिगत प्रेम नाही असलाच तर राग आहे पण त्याना कोरोना झाला तेव्ह उलट आनंद व्यक्त करणाऱ्या पोस्ट आल्या. आज व्यथित झालेल्या किती जणांनी प्रतिवाद केला ? आपण बोललो तर आपल्याला भाजपचे समजतील या भीतीने अनेकजण गप्प राहतात. आणि भाजप भक्तांना ते बोलण्याचा अधिकार नाही कारण सोनिया यांच्या आजारावरून अशाच असभ्य comment तेव्हा आल्या होत्या आणि ममतांच्या आजारावर यांचे तेच सुरू आहे

एखादी व्यक्ती मृत्यू झाल्यावर किमान एक आठवडा तरी त्यांचेवर टीका करू नये पण इकडे मृत्यू झाल्यावर ज्या comment येतात त्यावरही सर्व विचारसरणीचे लोक तुटून पडत नाहीत असे जाणवते..अपर्णा रामतीर्थकर यांच्या विचारांचे कोणीच समर्थन करणार नाही पण त्यांचा मृत्यू झाल्यावर दोन तासात त्यांची खिल्ली उडवणे सुरू झाले..अशावेळी त्यांच्या नातेवाईकांना काय वाटेल हे मनातही येत नसेल का ?

तेव्हा शरद पवार यांच्यावर ज्यांनी विकृत लिहीले त्यांच्यावर निषेध नाहीतर गुन्हेच दाखल करावेत. पण भाजप आयटी सेलच उद्योग करतो तरीही तिकडच्या नेत्यांवर होणाऱ्या असभ्य हल्ल्यांवरही बोलायला हवे...

हे सगळेच सिलेक्टिव्ह होत चालले आहे त्यामुळे स्तर घसरत चालला आहे ...आणि असे लिहीले की पुन्हा ट्रोलिंग जात काढणे हे होत राहते. नेते गप्प राहतात त्यामुळे समर्थक माजले आहेत. एक प्रसंग आठवतो...१९८१ च्या आसपास भाजपाच्या एका राष्ट्रीय अधिवेशनात रेड्डी नावाचे नेत्याने इंदिरा गांधी शूर्पणखा आहेत व अटल बिहारी यांनी त्यांचे निवडणुकीत नाक व कान कापावे अशी भाषा वापरली. सभागृहात टाळ्या वाजल्या पण अटल बिहारी यांनी रेड्डीच्या हातातला माईक कडून घेतला, अशी भाषा पुन्हा आपल्या व्यासपीठावर चालणार नाही असे बजावले. दुर्दैवाने वीस वर्षांनी त्याच पक्षाने आयटी सेल स्थापन करून विरोधकांवर त्यापेक्षाही खोल वार केले व विरोधी पक्षाचे नेते समर्थकही सोशल मीडियावर समोरच्या सापळ्यात सापडून तेच करत आहेत त्यामुळे या मारामारीत एकूणच राजकारणाचा आणि माणुसकी जास्त तर खाली खाली जात आहे.

Tags:    

Similar News