शरद पवारांना कधीतरी हे स्पष्ट करावे लागेल की, त्यांचे राजकारण व्यक्तिगत करिअरसाठी नाही. तर व्यापक देशहितासाठी आहे. भाजप सरकारने बहुमताच्या - फ्लोअर मॅनेजमेंटच्या जोरावर तीन कृषी विधेयकं लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर करून घेतली. शरद पवार यांच्या अप्रत्यक्ष पाठिंब्यानेच ही विधेयके मंजूर होऊ शकली. अर्थात, 'एनआरसी- सीएए' बद्दलही पवारांची भूमिका यापेक्षा वेगळी नव्हती.
कधीच थेट रिंगणात उतरायचे नाही, भूमिका घ्यायची नाही, कायम गोलमाल विधाने करायची, याला कोणी राजकीय मुत्सद्देगिरी म्हणत असेल, तर शरद पवार हे मुत्सद्दी नेते निश्चितपणे आहेत. आज जे शरद पवार या उद्धव सरकारचे शिल्पकार मानले जातात, तेच पवार २०१४ मध्ये देवेंद्र सरकारचेही शिल्पकार होते! राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावरच २०१४ मध्ये देवेंद्रांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाला, हे अनेकांना आठवत नसेल. उलट, देवेंद्रांचा शपथविधी सोहळा झाला, तेव्हा शिवसेना विरोधात होती.
मुत्सद्देगिरी आणि चारित्र्य यात काही फरक असतो! कधी इंदिरा गांधींना घालवा, कधी बाळासाहेब ठाकरेंसोबत जाहीर मेळावा; कधी भाजपसोबत युती, कधी राजीव गांधींसमोर शरणागती; कधी सोनियांच्या विरोधात बंडाची पुडी, कधी सोनियांशी लाडीगोडी; कधी मोदींशी समझोता, कधी राजसोबत मैत्रीचा देखावा; गुजरात निवडणुकीत मोदी-शहांशी मैत्री, महाराष्ट्रात उद्धव यांच्यावर प्रेमाची छत्री हे सगळे अंतर्विरोधपूर्ण डावपेच म्हणजे मुत्सद्देगिरी नव्हे.
राजकारणाला व्यापक असे अधिष्ठान नसेल आणि केवळ कोणाच्या व्यक्तिगत करिअरचाच तो मुद्दा असेल, तर त्यासाठी सामान्य माणसाने एवढे गंभीर व्हायचे कारण नाही. सामान्य माणसाने त्यापायी स्वतःला पणाला लावावे, असे त्यात काही थोर नाही!
महाराष्ट्रातला पाऊस म्हणजे 'देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार' यांच्यातील कुस्ती एवढाच मुद्दा असेल, तर तमाम महाराष्ट्राने त्याबद्दल इमोशनल व्हायचे कारण नाही. कसोटीची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय करता, त्यावर तुमचे जाणतेपण ठरते. लोकांनी काय काय सोडले, अनेकांचे प्राण गेले; अशावेळी तुम्ही काय सोडायला तयार आहात, यावरही तुमचे चारित्र्य ठरते! एरव्ही, बाकी तर छान सुरू आहे. 'राजकारण' म्हणजे चित्तथरारक खेळ फक्त असेल, तर तुम्ही काय आणि ते काय, सारे मस्तच चालले आहे!
- संजय आवटे