राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील झंजावाती व्यक्तिमत्व.. राज ठाकरे म्हणजे अमोघ वाणी..राज म्हणजे नुसती शैली - मतांच्या नावाने शिमगा... अगदी गावरान भाषेत सांगायचे तर राजचे भाषण म्हणजे वाळूत मुतले फेस ना पाणी... राज यांच्या गुणात्मक आणि संख्यात्मक राजकारणाचा आढावा घ्यायचा तर हेच सत्य आहे... मात्र, राज त्यापलिकडेही एक धोरणी राजकारणी आहे. त्याने हे त्याचे मुत्सद्दीपण २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत वेगळेपणाने सिद्ध करण्याचा जो विडा उचललाय तो निश्चितच उल्लेखनीय आहे.
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या दमदारपणे २००९ च्या निवडणूका आणि त्यानंतर राज्यात झालेल्या महापालिका निवडणूकांच्या माध्यमातून समोर आली ते पाहता राज यांची राज्यातील घौडदौड आता थांबणार नाही, असे वाटत होते. मात्र, राज यांनी २०११ साली रतन टाटांच्या सांगण्यावरून नरेंद्र मोदींच्या गुजरातचा दौरा केला आणि का कुणास ठाऊक त्यांच्या राजकीय उतरणीला सुरूवात झाली.
त्यानंतर त्यांनी २०१४ च्या निवडणूकीत निवडून आलेला एकमेव आमदारही गमावला. आज राज ठाकरे यांचा पक्ष पुन्हा २००९ च्या स्थितीत येऊन बसला आहे. पक्ष राजकीयदृष्ट्या १० वर्षे मागे गेला आहे. देशातील सर्वात मोठा आणि जूना असलेला कॉंग्रेस पक्षही आज खूप मागे फेकला गेला आहे. त्या तुलनेत राज यांना सावरण्याची ही संधी आहे. मधल्या काळात राज यांनी केवळ होईल ती परिस्थिती पाहण्यात आणि स्विकारण्यात वेळ घालवला. यांना पक्ष चालवायचा आहे की नाही? इथवर राजकीय तज्ञांमध्ये चर्चा होत राहिली.
मात्र, राज यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून राज यांनी घेतलेली राजकीय विरोधाची भूमिका अतिशय वाखाणण्याजोगी आहे. त्यांना लोकसभेची निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेतला असला तरी ठाम राजकीय भूमिका घेतली आहे. जी कदाचित विरोधीपक्षांनाही घेता आलेली नाही. राज यांच्याकडे आज गमावण्यासारखे खरंच काही नाही, त्यामुळे ते बिनधास्तपणे कुणालाही अंगावर घेताहेत, त्यामुळे आता 'नंगेसेतो मोदी शहा भी डरते है', अशी म्हटले तर वावगे ठरू नये. पण ते ज्या पद्धतीने मोदी-शहा विरोधी आपली भूमिका दाखले देवून मांडताहेत ती प्रखर जनमत तयार करणारी ठरू शकते.
राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे तसे पाहिले तर नवे नाहीत आणि ते कुणाला माहित नाहीत. काहीतरी नवीन आक्रित त्यांनी मांडले, असेही काही नाही. मात्र, जे माहीत आहे ते उघडपणे जाहीरपणे छातीठोकपणे मांडताना अगदी कॉग्रेस राष्ट्रवादीसारखे पक्षही दिसत नाहीत. हे पक्ष राफेल, पुलवामा, मोदी शहा आणि घराणेशाही या काही मुद्द्यांपलिकडे जाताना दिसत नाहीत. परस्परांवरील भ्रष्टाचारांच्या टीका आणि मतदारसंघातील पारंपरिक वर्चस्वाच्या लढायांपलिकडे या लुटपूटूच्या चकमकी जात नाहीत. गेल्या निवडणूकीत विकास योजना, डिजीटल इंडिया आणि महा रोजगाराच्या गप्पा मारणारे मोदी आता कॉंग्रेस कशी भ्रष्ट आहे. याच्या रंजक कथा मतदारांना सांगत फिरताहेत.
राज ठाकरे जे सांगताहेत ते नक्कीच वेगळे आहे. मोदींनी कसे अख्ख्या देशाला बंदिशाळा केले आहे. योजनांच्या नावाने कसा चुना लावला आहे आणि देशभक्तीचा बुडबुडा तयार करुन त्यावर मतदानाचे पीक कसे काढून घ्यायचा प्रकार आहे. हे राज ठाकरे यांनी सप्रमाण दाखवून देण्यास सुरूवात केली आहे. राज ठाकरे आज जागल्याच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या या भूमिकेचा कदाचित विरोधीपक्षांना आजमितीला फायदाही होईल. पण नीट विचार केला तर आगामी विधानसभांसाठी राज ठाकरे यांनी मनसेची भूमिका पक्की करण्यास आणि मतदारांना आपली आपल्या पक्षाची आगामी वाटचाल काय असणार आहे. त्यासाठी मतदारांची मनोभूमिका तयार करण्यास केलेली सुरूवात मानता येईल.