दिवाळीत जपा समाजभान !

यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट आहे. पण या संकटातूनच शिकत मानवाने आतापर्यंत केलेल्या चुका सुधारुन नव्याने सुरूवात करण्याची गरज आहे, यासाठी नेमके काय केले पाहिजे याचे विश्लेषण केले आहे. अर्थतज्ञ आणि महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच.एम. देसरडा यांनी.. प्रा. एच.एम. देसरडा;

Update: 2020-11-14 05:11 GMT

यंदाची दिवाळी ९० टक्के भारतीय जनतेसाठी करोना महामारी, आर्थिक मंदी या अवस्थेत अवतरली आहे. अर्थात ज्या 10 टक्के धनिक-अभिजन महाजन-सत्ताधीशांची रोजच दिवाळीची धामधूम चालू असते ते मात्र करोनामस्त आहेत.... महामारी असो की अन्य आपत्ती असो ती यांच्यासाठी सत्ता-संपत्ती-प्रतिष्ठा वाढविण्याची पर्वणी असते. सध्या बहुसंख्य जनतेची विवंचना आज काय खायचे, कसे जगायचे तर धनिकांचा प्रश्न आज काय काय खायचे, नि प्यायचे! बडेजाव मिरवणारे, चैनचंगळीचे कोणकोणते सामान खरेदी करायचे, कोणती आलिशान मोटार खरेदी करायची, देश-परदेशात कुठे फेरफटका मारायचा, ऐषआराम मौजमजा करायची, फटाके फोडण्याची, रोशनाईची स्पर्धा करायची, ही धनिकांची दिवाळी...

भारतातीत १३८ कोटी लोकसंख्येपैकी तब्बल शंभर कोटी (होय, एक अब्ज) लोक कमीअधिक प्रमाणात अभावग्रस्त जीवन जगण्यास मजबूर आहेत. नरेंद्रभाईच्या राजवटीत मुकेश भाईचे उत्पन्न तासाला ९० कोटी रूपये तर ९० कोटी भारतीयांचे नऊ रूपये देखील नाही! अंबानी-अदानीच कशाला गावागावातले भूमाफिया बिल्डर, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, मोटार वाहन विक्रेते, मद्य अन्य अमली पदार्थ विक्रेते, सोने-चांदीचे व्यापारी, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, उद्योगपती, अधिकारी व बहुसंख्य लोकप्रतिनिधी राजेशाही थाटात जगतात, सरंजामी लवाजमा बाळगतात. त्यांच्यात व गाव शहर परिसरातील सामान्य लोकांच्या जगण्यात, जीवनशैलीत किती भयावह विषमता आहे, याचा दिवाळीचे दिवे लावताना विचार का होत नाही? आपल्या चैनचंगळवादी जीवनशैलीमुळे, मोटारवाहनांमुळे शहरे किती प्रदूषित करतो याचा अंतर्मुख होऊन कधी विचार होणार का? हा विकास आहे की विनाश?

करोना टाळेबंदीमुळे बहुसंख्य शहरातील प्रदूषण कमी व्हायला लागले होते. गोंगाट कमी होऊन शहरे सभ्य जाणवत होती. पक्ष्यांचे मधुर आवाज ऐकायला येत होते. मात्र, जुनी आर्थिक राहटी, धबडगा सुरू होतो न होतो तोच परत तोच गोरखधंदा. आता लग्नकार्ये, अन्य समारंभ, पार्ट्या, पार्टीबाजीचा धुमधडाका सुरू झाला की मागचा सगळा अनुशेष भरून काढण्यात सर्व गर्क होणार! हे सर्व वांछीत व अपरिहार्य आहे का, खचितच नाही...

या संदर्भात एक गंभीर बाब नीट लक्षात घेण्याची नितांत गरज आहे की, आपण ज्या हवेचा श्वास घेतो, जे पाणी पितो, जे अन्न खातो ते सर्व प्रदूषित, विषाक्त झाल्यामुळे आरोग्याला हानीकारक आहे. मग हा विकास नावाचा महाखटाटोप कशासाठी चालू आहे, चालवला जात आहे.

करोनासारख्या महामारीची भीषण आपत्तीच मुळी मानवाने निसर्ग व्यवस्थेत जो अविवेकी, अनाठायी हस्तक्षेप केला आहे, जैवविविधता व प्राण्यांच्या अधिवासावर आक्रमण केले, त्यामुळे ओढवली आहे. अर्थात 'करे कोई, भरे कोई' यामुळे धनदांडग्यांचा, विकासवाल्यांचा अधोरी लालसेचा विपरीत परिणाम होतो तो बिचाऱ्या गोरगरिबांवर!

येथे आणखी एक बाब आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की सर्व धर्मांनी विविध प्रकारे निसर्गाविषयी पूज्यभावाची शिकवण दिली आहे. मानवासह यच्चयावत जीवसृष्टीच्या भल्यावर भर दिला आहे. निसर्गव्यवस्थेला इजा न पोहचवता आपल्या गरजा भागवाव्यात, पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंचतत्वे सर्वांच्या समानहित व सुखासाठी समानतेने, न्यायबुद्धीने आपसात वाटून घ्यावी. तीळ देखील वाटून खावी असे सांगितले आहे. बुद्धाने तृष्णाक्षय, महावीराने अपरिग्रहाचे महत्त्व प्रतिपादन केले आहे. फुले आंबेडकरांनी समतेचा पुरस्कार तर गांधीजींनी सत्य अहिंसेला सर्वस्व मानले आहे.

खेदाची बाब म्हणजे सध्या लोक म्हणजे व्यक्ती, नागरिक, प्रबुद्धजन अथवा संविधानातले आम्ही भारताचे लोक नसून ग्राहक, श्रमिक, मतदार असा धनिक, महाजन अभिजन वर्गजातीवाल्या सत्ताधीशांच्या धंद्याचा कच्चामाल झालो आहोत. अर्थसत्ता, राज्यसत्ता, तंत्रसत्ता दमन यंत्रणा यांचेद्वारे लोकांना गुलाम बनवून त्यांचा छळ, शोषण केले जाते, वेठीस धरले जाते. अन्याय अत्याचार, हिंसा, दहशत गुंडागर्दी, माफियाराजद्वारे तमाम मानवी हक्क व लोकशाही अधिकारांचे हनन केले जाते. उपरिनिर्दिष्ट पार्श्वभूमी व परिप्रेक्ष्य ध्यानी घेऊन या दिवाळीत तसेच येऊ घातलेल्या सर्व धर्मांच्या सणासुदीच्या तसेच दैनंदिन व्यवहारातीत निसर्ग व मानवविरोधी रूढींना जाणीवपूर्वक टाळले पाहिजे. काय करावे, काय करू नये! याचा सद्यः संदर्भात निर्देश पुढीलप्रमाणे करता येईल.

१) फटाके वाजवणे, आतषबाजी करणे कटाक्षाने टाळावे

२) व्यक्तिगत वापराच्या मोटारवाहनांचा वापर केवळ अपवादात्मक, अपरिहार्य आपत्ती प्रसंगीच करावा. सायकल व सार्वजनिक वाहनांद्वारेच प्रवास करण्याची सवय लावावी

३) सेंद्रिय सात्विक आहार, साधी व संयमी जीवनशैली जाणीवपूर्वक अवलंब करावी, चैनचंगळ, संपत्तीचे प्रदर्शन, समारंभ संमलनं, पार्ट्यांना कायमची सोडचिठ्ठी द्यावी.

४) दारू, मद्यार्क, अन्य अमली पदार्थ तसेच तंबाकू, गुटखा आदी आरोग्यास हानिकारक उत्पादन व सेवनास बंदी घालण्यात यावी.

५) घरातील फारसे उपयुक्त नसलेले आणि अतिरिक्त कपडे, उपकरणे, पुस्तके अन्य सामान गोरगरिबांना व गरजूना द्यावे

६) आपल्या माहिती, संपर्कातील, गावमोहल्ल्यातील जेवढ्या जास्त लोकांना सहाय्य करता येईल ते करावे

७) हवामान बदलाचे अरिष्ट लक्षात घेऊन वसुंधरा व मानव हिताची प्रतिज्ञा घ्यावी, कृती करावी.

-प्रा. एच.एम. देसरडा

(लेखक नामवंत अर्थतज्ञ असून महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे सदस्य होते)

Tags:    

Similar News