ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही किंवा ब्राम्हो कॅपिटॅलिझम असे शब्द सर्रास वापरले जातात; या मांडणीत तथ्य तर नक्कीच आहे. या मांडणीत दोन गोष्टींची दखल घेण्याची/ करेक्शन करण्याची गरज आहे…
(अ) भांडवलशाहीऐवजी “कॉर्पोरेट वित्त भांडवलशाही” असा शब्दप्रयोग रुजवण्याची नितांत गरज आहे. नुसत्या भांडवलशाही शब्दाने कोट्यवधी छोटे खाजगी भांडवल असणारे मालक दूर गेले आहेत.
(ब) ब्राह्मणशाही भारतापुरती मर्यादित असली तरी कॉर्पोरेट वित्त भांडवलशाही ही सर्वार्थाने जागतिक शक्ती आहे; त्यामुळे त्याचे विश्लेषण जगाच्या कॅनव्हासवरच होऊ शकते.
दोन्ही प्रणालीतील साधर्म्य म्हणजे त्या कोट्यवधी लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर निर्णायक प्रभाव टाकतात.
अनेक संकल्पना, प्रमेये जणूकाही भौतिक किंवा रसायनशास्त्रासारखी स्वयंभू आहेत. हे जनमानसावर रुजवतात; स्वयंभू म्हणजे त्याला वेगळे सिद्ध करायची गरजच नाही. उदा. ब्राम्हण जन्माने श्रेष्ठ असतात असे वाक्य...
कॉर्पोरेट वित्त भांडवलशाहीने, विशेषतः गेल्या ४० वर्षाच्या नवउदारमतवादात अशी अनेक प्रमेये सामान्य लोकांमध्ये रुजवली...
त्यांच्या यशाचे इंगित दंडसत्तेत जेव्हढे आहे. त्यापेक्षा त्यांनी विचार रुजवण्यासाठी उभ्या केलेल्या यंत्रणांमध्ये आहे. नुसते विचार मांडणे पुरेसे नसतात, विचार रुजवण्याच्या यंत्रणा उभ्या करणे. अधिक महत्त्वाच्या असतात. काही उदाहरणे पाहू
१. श्रीमंत व्यक्ती श्रीमंत होतात. कारण त्यांच्यात नेतृत्वगुण असतात. ते जोखीम घेतात, ते प्रचंड कष्ट घेतात म्हणून...
२. सरकार कोठे कोठे पुरे पडणार ; नागरिकांनी स्वतःची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे
३. उपक्रमांना वित्तीय तोटा येणे म्हणजे महापाप; वित्तीय तोटा येणारे उपक्रम लवकरात लवकर बंद केले पाहिजेत
४. माणसे स्वार्थी झाल्यामुळे मूल्यऱ्हास झाला आहे ; म्हणून अर्थव्यवस्थेत बजबजपुरी माजली आहे, म्हणून संस्कार महत्वाचे
५. मानवी इतिहासात प्रत्येकजण दुसऱ्याचे शोषण करतच आला आहे; शोषण कोठे नाही? कम्युनिस्ट चीनमध्ये देखील आहे.
६. सगळ्या आर्थिक प्रश्नांची मुळे लोकसंख्येत आहेत.
७. देशातील स्टॉक मार्केट, सेन्सेक्स वाढता असेल म्हणजे अर्थव्यवस्था नीट सुरु आहे.
८. काहीही झाले तरी देशाची जीडीपी सतत वाढती राहिली पाहिजे; बाकीचे आपोआप होतंय.