पुणे विद्यापिठातील आंदोलनकारी विद्यार्थ्यांवर प्रशासनाने परत एकदा पोलिसी बळाचा वापर केला आहे. विद्यापिठाच्या मेसच्या वादासंदर्भात आंदोलन करणाऱ्या आक्रमक विद्यार्थ्यांना पोलीसांच्या ताब्यात देऊन विद्यापीठ प्रशासन मोकळं झालं.
पुणे विद्यापिठातील मेसने एका ताटात दोन विद्यार्थ्यांना खाता येणार नाही अशी भूमिका घेतली. अनेक गरीब विद्यार्थी या मेस मध्ये जेवतात. पैसे परवडत नसल्याने बऱ्याचदा एका ताटात दोन विद्यार्थी जेवतात. अर्धपोटी राहतात. याबाबत विद्यापिठ प्रशासनाने कडक भूमिका घेत नवीन नियमावली जारी केली.
या नियमावलीबाबत चर्चा करावी अशी मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी बोलायचं सोडून पोलीसांकरवी मेसचे दरवाजे अडवायचा निर्णय विद्यापिठ प्रशासनाने घेतला. गेल्या काही वर्षांपासून प्रशासन विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याएवजी सतत पोलीसांच्या मागे लपताना दिसतंय. सतत विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले जातायत. कुठल्याही विद्यापिठाने विद्यार्थ्यांशी चर्चेचे दरवाजे बंद करणे हे भविष्याच्या दृष्टीने घातक आहे.
मेसचे कायदे, नियम तिथे ज्या पद्धीतीचे विद्यार्थी येतात, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे जग या गोष्टी विद्यापिठाच्या माहितीबाहेरच्या नाहीत. विद्यापिठ प्रशासनाचे अनेक गेस्ट या मेस मध्ये जेवायला येतात त्यामुळे ही या मेस वर ताण वाढलाय.