स्वामी अग्नीवेश (swami agnivesh) त्यांचा जन्म श्रीकाकुलम चा. त्यांचे वडील आजच्या छत्तीसगडमधील संस्थानात नोकरी करायचे. त्यांनी कायद्याची पदवी घेतली कोलकत्यातून. पुढे देशाचे सरन्यायाधीश झालेल्या सब्यसाची मुखर्जी यांच्या हाताखाली वकील म्हणून त्यांनी काम केलं होतं. त्यांनी काही काळ प्राध्यापकीही केली. पुढे त्यांनी हरयाणात जाऊन आर्य समाजाची दीक्षा घेतली. ते संन्यासी झाले.
हरयाणा सरकारमध्ये मंत्री होते. त्यांना आर्य समाजातून काढून टाकण्यात आलं. मंत्री असताना त्यांनी वेठबिगारांच्या प्रश्नाला वाचा फोडली. पुढे स्त्री भ्रूणहत्येच्या विरोधातील मोहीमेत सहभागी झाले. जगन्नाथ पुरीचं मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश मिळावा अशी मागणी त्यांनी केली.
काश्मीर आँब्झर्वर या दैनिकाच्या बातमीनुसार हिंदुराष्ट्रवाद्यांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. कारण अमरनाथ यात्रेबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. वेठबिगारांच्या प्रश्नावर आंदोलन केलं म्हणून ते काही काळ कारावासातही होते. पोलिसांना सोडून देण्यासाठी माओवाद्यांशी वाटाघाटी करण्यातही त्यांचा सहभाग होता. हिंदुत्ववांद्यांनी त्यांना मारहाणही केली होती. हा संन्यासी हिंदुत्ववाद्यांना शत्रू वाटायचा.
वैदिक समाजवाद हे पुस्तकही त्यांनी लिहीलं. या सद्ग्रहस्थांचा राजकीय, सामाजिक, सांसकृतिक प्रभाव वा वलय काय होतं, का होतं हे मला कधीही कळलं नाही. बहुधा विवेकानंद हा त्यांचा आदर्श असावा. त्यांचा पेहराव व भाषेची नक्कल ते करायचे. परंतु विवेकानंदांएवढे ते बुद्धिमान नव्हते. अकारण महत्व मिळालेला चलाख परंतु सज्जन माणूस होता तो. त्यांना आदरांजली.