२०१४ मधील अभूतपूर्व मोदी सुनामीनंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. हा निर्णय आत्मघातकी ठरू शकला असता. पण, हा धोका उद्धव ठाकरे यांनी पत्करला. तो निर्णय प्रामुख्याने आदित्य ठाकरे यांचा होता. आदित्य तेव्हा युवा सेनेचे प्रमुख होते. शिवसेनेनं भाजपच्या विरोधात जोरदार मुसंडी मारली. तब्बल ६३ जागा जिंकल्या. याला जिगर नाहीतर, काय म्हणतात?
२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत स्वतः उभे राहायचे आदित्य यांनी ठरवले. ही 'रिस्क' होती. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला घाम फोडणारा भाजप आदित्यचा गेम करू शकला असता. अनेक ठिकाणी त्यांनी शिवसेनेच्या उमेद्वारांना पाडलेही. 'ठाकरे' पडले असते, तर काय झाले असते? पण, इतिहासात पहिल्यांदाच आदित्य यांनी ती 'रिस्क' घेतली.
निकालानंतर भाजपला सोडून दोन्ही कॉंग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेण्यातही आदित्य यांचाच पुढाकार होता. आणि, मुख्यमंत्री उद्धव यांनीच व्हावे, यासाठीही. असा निर्णय घ्यायला किती इंचांची छाती लागते?
सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनात गेलेले आदित्य रिकाम्या हाती परतले. मग, उद्धव यांचे नाव जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी धक्के दिले. तरीही, आदित्य अविचल राहिले. पर्यावरणमंत्री, मुंबईचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेताना, ते बावरले वा गोंधळले नाहीत.
अगदी त्याहीपूर्वी, देवेंद्रांची महाजनादेश यात्रा सुरू असताना आणि देवेंद्र हेच एकमेवाद्वितीय नेते असताना, त्यांच्या नाकावर टिच्चून 'जनआशीर्वाद यात्रा' काढणारे आदित्यच होते. 'महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री' अशी स्वतःची प्रतिमाही त्यांनी होऊ दिली. 'मातोश्री'च्या कुशीतून नव्हे, तर रस्त्यावर येऊन राजकारण करणारा; विधिमंडळात विरोधकांशी दोन हात करणारा; मंत्रालयात येऊन फाइल्सवर सही करणारा असे बहुपेडी 'ठाकरे रूप' महाराष्ट्राने प्रथमच पाहिले.
दूर कशाला, 'व्हॅलेंटाइन डे'ला विरोध करणा-या शिवसेनेनं 'नाइट लाइफ'बद्दल रसरशीत भूमिका घेणं सोपं नव्हतं. हिंदुत्व वगैरे मुद्दे बाजूला ठेऊन पीक विमा, शेतकरी आत्महत्या, रोजगार, पर्यावरण यावर आक्रमक आंदोलन उभं करणं, भूमिका घेणं सोपं नव्हतं.
ते आदित्य यांनी केलं. न्यूनगंडाचं राजकारण सोडून जमिनीशी नाळ असलेलं राजकारण आदित्य यांनी सुरू केलं.
आदित्य यांच्या व्यक्तिमत्त्वात बाळासाहेब वा राजचा करिष्मा नसेल, त्यांच्या आवाजाला तो 'खर्ज' नसेल, पण आदित्यला लेचापेचा समजण्याची चूक कोणी करू नये.
आदित्य यांना अद्याप स्वतःला सिद्ध करायचे आहे हे खरेच, पण त्यांचा प्रवास आश्वासक आहे. आदित्य उगाच डरकाळ्या फोडत नसतील, पण एकदा एखादी गोष्ट ठरवली की ती करूनच ते स्वस्थ बसतात, असेच त्यांचे 'ट्रॅक रेकॉर्ड' दिसते आहे!
'पप्पूकरणा'च्या आणि प्रतिमा-हननाच्या या कारस्थानांतून आदित्य तावून-सुलाखून झळाळून जातील. कारण, वरवर जाणवत नाही, पण या 'लिटल मास्टर'मध्ये अंगभूत असा कणखरपणा आहे. हे माझं पर्सेप्शन आहे. बघू या!