रियाला अटक...त्यांचं काय? घराणेशाहीच्या 'सेल्फी' शगिरीमुळे 'ते' वाचणार ?
सुशांतचा रहस्यमय मृत्यू झाला तो १४ जून रोजी. मुंबई पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. समाजमाध्यमांवर सुशांतला न्यायासाठी जोरदार आवाज उठवला जावू लागला. सुशांतनं आत्महत्या केली नसून त्याचा बॉलिवूडमधील घराणेशाहीनं बळी घेतलाय, असा आरोप एकाचवेळी अनेकांकडून केला गेला. त्यातही रियाच्या अटकेनंतर आनंद व्यक्त करणाऱ्यांसारख्याच अनेकांनी बॉलिवूड घराणेशाहीविरोधात मोहिम चालवली.
कधी घराणेशाहीविरोधात करण जोहर, कधी धार्मिक कारणांमुळे खानांविरोधात हॅशटॅगही ट्रेंड झाले. बॉलिवूड प्रस्थापित घराण्यांमधील स्टार पुत्र-कन्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. त्यांच्या चित्रपटांवर बहिष्काराचीही भाषा वापरली गेली. ज्यांच्याविरोधात हॅशटॅग ट्रेंड झाले त्यांचे देशाच्या पंतप्रधानांसोबतचे सेल्फी फोटोही काहींनी ट्रेंड केले. राजकारण दोन्ही बाजूंनी उफाळलं. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुशांत प्रकरण राजकारणामुळे भलतं वळण घेत आहे हे लक्षात आलं नाही. ते गाफिल राहिले. केलेल्या तपासावर संतुष्ट.
त्यांची अडचण झालीच. पण तरीही एक बरं वाटत होतं. काही वेगळं घडतंय. अनेकांना वाटलं होतं. बॉलिवूडमध्ये सुशांतच्या मृत्यूनंतर दबलेला असंतोष व्यक्त करणारी, सर्वच प्रतिभावंतांना समान न्याय मिळवून देणारी क्रांती घडतेय की काय! पण तसं काहीच झालं नाही. अचानक बिहार पोलीस सक्रिय झाले. तिथं पाटण्यात रिया चक्रवर्ती या सुशांतच्या मैत्रिणीविरोधात गुन्हा नोंदवला गेला.
झपाट्यानं हालचाली झाल्या. राजकारणही जोरात रंगू लागलं. रंगतंय. थेट आदित्य ठाकरेंपर्यंत भाजप नेत्यांनी नाव न घेता आरोप केले. सीबीआय चौकशीची मागणी सुरु झाली. महाराष्ट्र सरकारनं ती फेटाळताच बिहार सरकारनं मात्र, तातडीनं तशी शिफारस केली. पुढे सर्वोच्च न्यायालयानंही सीबीआय चौकशीच्या बाजूनं कौल दिला. सीबीआय चौकशी सुरु होती. त्यात डीआरआयनंही तपास सुरु केलाच होता. त्यांना सापडलेल्या माहितीवरून एनसीबी म्हणजेच अंमलीपदार्थविरोधी तपास यंत्रणेचा प्रवेश झाला.
आता अटकेची कारवाई केली आहे. ती एनसीबीने. आरोप सुशांतला रियाने भाऊ आणि मित्रांच्यामाध्यमातून गांजा हा अंमलीपदार्थ मिळवून दिल्याचा. प्रकरण ड्रगचं. ड्रग हे मानवजातीला झालेला कर्करोग असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यामुळे डिलर असो, पेडलर असो की यूजर. ड्रग प्रकरणात कारवाई झालीच पाहिजे. त्याबद्दल कुणाचंही दुमत असू नये.
पण एक अपेक्षा. यूजर किंवा पेडलर कारवाई तर मुंबईचे बीट हवालदारही करतात. बिहार गाजवून आलेले आयपीएस शिवदीप लांडेही गेले वर्षभर ड्रग माफियांविरोधात त्यांच्यापरीनं कारवाई करतच आहेत.
एनसीबीनं, डीआरआयनं, सीबीआयनं बीट हवालदारांच्या पुढे जावं. फक्त यूजर, पेडलर नको. मोठे डिलर, त्यांचे ड्रग कार्टेल चालवणारे इंटरनॅशनल माफियांच्याही मुसक्या आवळाव्यात. फक्त रिया सापडल्यानं राजकीय लक्ष्य पूर्ण झालं असेल. पण ड्रग विळख्यातून देश सोडवायचं राष्ट्रीय लक्ष्य विसरू नये. ते जास्त महत्वाचं!
दुसरी आठवण करून द्यायची आहे. ती आज रियाच्या अटकेनंतर आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांना. तुम्हीही तुमची आधीची मोहिम विसरू नका. बॉलिवूडमधील घराणेशाहीवरील, 'खान'दानांवरील तुमचे आरोप तुम्ही विसरला असाल पण डिजिटल युग साऱ्याचीच नोंद ठेवते. रियानंतर तुम्ही ज्यांची ज्यांची नावे घेतली. ते बॉलिवूडमधील सारेच चौकशीच्या फेऱ्यात, पुरावे सापडले तर कारवाईच्या घेऱ्यातही आलेच पाहिजेत. कंगनासारखी साक्षीदार आहेच. त्यामुळे पुरावे नाहीत, असंही म्हणता येणार नाही. नाही तर घराणेशाहीमुळे 'ते' वाचले, 'ही' बळीची बकरी, अशी 'सेल्फी'शगिरी झाली असं वाटायचं!