राम मंदिर: 2000 वर्षांपासून अस्पृश्यता लादलेल्या समुहाचा हिशोब कोण देणार?
१९३० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या एका दलित जातीत जन्माला आलेल्या माणसाने मंदिर आंदोलन सुरू केलं होतं. नाशिकच्या काळाराम मंदिरात स्पृश्य हिंदुप्रमाणे अस्पृश्यांनाही प्रवेश करता यावा. त्यांचं श्रद्धास्थान असलेल्या रामाला पुजण्याचा अधिकार त्यांना मिळावा. अशी त्याची मागणी होती. प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी सत्याग्रह केला.
हे अहिंसक आंदोलन पाच सहा वर्षे चाललं. पण, हिंदू धर्माचे रखवालदार सवर्ण आणि स्पृश्य हिंदुंनी हे आंदोलन मोडून काढलं. त्यासाठी शक्य होतील ते प्रयत्न केले. आंदोलकांची डोकी फोडली, रक्त सांडलं. पण, दलितांच्या स्पर्शापासून हिंदुंनी रामाला वाचवलं. रामाचं पावित्र्य राखलं. ज्या देवावर तुमची आस्था आहे. त्याच्यावर आमचीही आहे. त्यामुळे तुम्हाला त्याची पूजा करण्याचा जसा अधिकार आहे. तसा आम्हालाही मिळायला हवा. आम्ही तुमच्या बरोबरीचे आहोत. असं सांगण्यासाठी ते आंदोलन होतं.
सामाजिक समानतेसाठीचा तो प्रतिकात्मक लढा होता. पण, दलितांचं रक्त प्रतिकात्मक नव्हतं. ते खरच होतं. परत एकदा एका विद्यापीठाला त्याच डॉ. आंबेडकर यांचं नाव द्यावं. या मागणीसाठी दलित भांडले. तिथंही दलित मेले. प्रतिकात्मक नाही, खरच मेले. संस्कृती ही गोष्ट दाखवता येत नसली तरी ती असते. पण ती नेहमी जिंकणाऱ्याच्याच ताब्यात असते.
हे मंदिर आंदोलन आठवायला कारणही तसंच आहे. तीस वर्षांपासून एका राजकीय पक्षाकडून चालवलेल्या मंदिर आंदोलनाचा कळसाध्याय सुरू झाला आहे. या आंदोलनात सत्याग्रह नव्हता, दुराग्रह होता. दलितांसारखी दुबळी बाजू नव्हती. संख्याबळाची प्रचंड मोठी ताकद होती आणि वरती सत्तेचा वरदहस्त होता.
अस्मिता ते सत्ता आणि सत्ता ते अस्मिता असा मोठा यशस्वी प्रवास या आंदोलनाने केला. आणि आता उन्मादी अहंकारापर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा या अट्टाहासाला बळकटी देणाऱ्या काळाला सुरुवात झाली आहे. आमची प्रतिकं तीच राष्ट्राची प्रतिकं, आमची भाषा तीच राष्ट्राची भाषा, आमची श्रद्धा हीच राष्ट्राची श्रद्धा हा दुराग्रह आता कायदा बनण्यास सुरुवात झाली आहे.
पाचशे वर्षांचा लढा जिंकल्याच्या वल्गना केल्या जात आहेत. कुणाशी आहे हा लढा? कोणत्या गुलामीच्या गोष्टी केल्या जात आहेत? गुलामी आणि अत्याचारांचा हिशोब मांडायचाच झाला. तर दोन हजार वर्षांपासून अस्पृश्यता लादलेल्या समुहाचा हिशोबही करावा लागेल. तुमच्याच घरात संस्कृतीच्या नावावर बटीक म्हणून बांधून ठेवलेल्या बाईच्या गुलामीचा हिशोबही द्यावा लागेल.
तुमचा विजय हा यांचाही विजय आहे असं भासवून तुम्ही दिशाभूल करत आहात. आणि हेही बावळट ते खरं मानत आहेत. हजारो वर्षांपासून ज्यांची विचारशक्तीच कुंठित केली गेली असेल. ते दुसरं काय करणार. आपल्यावर अत्याचार करणारा आपल्याला गोड बोलत आहे. हीच त्याच्यासाठी मोठी गोष्ट. अयोध्येतील राम मंदिराचा जल्लोष करणारे काळाराम सोयीस्कर विसरतात. या रामाविषयी ते सांगत असताना त्या रामाविषयी प्रश्न तर विचारला जाणारच.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना भारताने आधुनिक राजा आणि धर्मगुरू म्हणून परवानगी देऊन टाकली आहे काय? त्यांच्या बोलण्यातील थाट तर तसाच होता. राम मंदिर राष्ट्रीय ऐक्याचे आधुनिक प्रतिक असेल असं त्यांनी सांगितलं. पण ज्याच्या निर्माणाचा पाया विभाजनाने घातला असेल, ते ऐक्य कसे साधणार?
मध्ययुगीन भांडणाचा बदला पूर्ण झाल्याचं समाधान दोन्ही नेत्यांनी व्यक्त केलं. आणि आधुनिक लोकशाहीवादी भारतापुढे किती मोठं आव्हान आहे. हेच अधोरेखित केलं. गम्मत म्हणजे कम्युनिस्ट पक्षांचा अपवाद वगळता सर्व पक्ष याचे मूक साक्षीदार झाले. किंवा आम्हीही तुमच्याच बाजुचे आहोत असं आडून आडून सांगू लागले.
एका धर्म समूहाच्या श्रद्धेला मोडून दुसर्याआ समूहाच्या श्रद्धेला मोठं करणं, हे कुठल्या धर्मनिरपेक्ष लोकशाही देशाच्या कायद्यात बसतं? आणि तुमची श्रद्धा हीच सगळ्यांनी स्वीकारावी हा तुमचा अट्टाहास. तुमचं ते राष्ट्रीय आणि बाकीच्यांचं फुटीरता निर्माण करणारं?
राम मंदिर आंदोलन हा संघ आणि भाजपच्या राजकीय महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी देशावर लादलेला प्रकल्प होता. हे तर खुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांनी कबूल केलंय. भाजपचे खासदार असणारे नेते वर्तमानपत्रात लेख लिहून जाहीर सांगू लागले आहेत.
एका पक्षाच्या सत्तेसाठी संपूर्ण देशाच्या एकतेला वेठीस धरले गेले. समाजात दशकांपासून अविश्वास पेरला गेला. आणि अजूनही त्यांची भूक शमली आहे असं दिसत नाही. ही नव्या भारताची सुरुवात आहे असं ते सांगत आहेत.
आता नवा भारत शांतता, सौहार्द जपणारा असेल अशी खात्री बाळगता येईल का? आरेसेस आणि भाजपच्या भारतात सर्वधर्मसमभावाला जागा असेल का? ज्याप्रमाणे भारतातले बहुसंख्य राजकीय पक्ष गप्प आहेत. तसेच भारतीय मीडिया सुद्धा गप्प आहे. काही अपवाद सोडला तर बहुतांश मीडियाला हे प्रश्न पडलेच नाहीत. भूमीपूजनाचा सोहळा दाखवणं गरजेचं असेलही. पण, तो दाखवताना मशीद कधी बांधली जाणार आणि तिच्या भूमिपूजनालाही पंतप्रधान येणार का? असा प्रश्न विचारता आला असता.
बाबरी पाडणं हे बेकायदेशीर कृत्य होतं. तर गुन्हेगारांना शिक्षा होणार का? हे विचारता आलं असतं. मंदीर मशिदीच्या नावावर आतापर्यंत ज्या लोकांचे जीव गेले. त्याला जिम्मेदार कोण? हेही विचारता आलं असतं. पण, माध्यमं भाजपच्या जमातवादी रंगात बुडून गेली. मंदिराच्या विटा मोजत बसली. मोदींच्या कपड्याचे माप काढत राहिली. देशात फुटीला आणि अशांततेला खतपाणी घालणाऱ्या घटनेला ऐतिहासिक म्हणत राहिली.
द्वेषाच्या अधिनायकांच्या आरत्या ओवाळत राहिली. हे करताना अपराधीपणाचा लवलेशही नव्हता. माध्यमं सत्तेच्या मंदिरात घंटा बडविणारे पोटार्थी पुजारी झाले आहेत. त्यांना आता प्रश्न पडत नसतीलही. पण, येणाऱ्या पिढ्या जेव्हा लोकशाहीसाठी लढत असतील, तेव्हा त्या नक्की प्रश्न विचारतील की, त्यावेळी तुम्ही काय करत होता? माध्यमं आणि राजकीय पक्षांना याचं उत्तर द्यावं लागेल. आणि अर्थातच जमातवादी उन्मादात मश्गुल असणाऱ्या नागरिकांना सुद्धा.
कौस्तुभ पटाईत
(सदर पोस्ट ही कौस्तुभ पटाईत यांच्या फेसबुक वॉल वरून घेतली आहे)