विरोधकांना काही लाजा शरमा!!

Update: 2020-09-16 08:52 GMT

सरकारला कोरोना काळात स्थलांतरीत मजूर किती मेले? किती जगले? याची माहीती नाही. यावर आता किती बोंबलाल?

काय काय कराव या सरकारनं? सत्तेवर आल्या आल्या काँग्रेसने 60 वर्षे करुन ठेवलेल्या घाणीचे ढीग उपसता उपसता बिचा-यांची दमछाक झाली. काँग्रेसने अन्याय केलेल्या वल्लभभाईंचा पुतळा उभारुन बिचारे मेटाकुटीस आले. 370 कलम रद्द करून काश्मीरच्या विकासाचा तुंबलेला पाट मोकळा करण्यासाठी घाम गाळला. देशात उभ्या असलेल्या स्वायत्त संस्थांची मोडतोड करायला कमी कष्ट करावे लागले?

जगाच्या कल्याणा नमोची विभुती या न्यायाने जगभर पायपीट केली. दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी नोटाबंदी केली.

बुडती हे जन देखवेना डोळा या कळवळ्यातून टि.व्ही.वर भाषण दिलीत. "मन की बात "केली. स्त्री जातीच्या कळवळ्यातून कंगंनाला अतीउच्च सुरक्षा दिली. अठरा- अठरा तास काम करुन अजून किती मरावं माणसाने देशासाठी?

काही किंमत?

अजून किती किती कामांची यादी द्यायची? पण मेल्या़ंना यातल कश्याचच काही कौतुक नाही. पण कोरोना काळात स्थलांतरीत किती मजूर जगले मेले. याची स़रकारला माहिती नाही यावर मात्र बोबलताहेत. विरोधकांना काही लाजा शरमा!!

Similar News