सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा सवाल सध्या काही लोकं विचारतायत. जे लोक परदेशातून आलेयत आणि ज्यांना संशयित कोरोना रूग्ण म्हणून विलगीकरणासाठी सांगण्यात आलंय. अशा लोकांच्या डाव्या हातावर ‘प्राऊड मुंबईकर’ असा शिक्का मारण्यात येत आहे. विलगीकरण सांगण्यात आलेल्या संशयित रूग्णांनी सार्वजनिक ठिकाणी मिसळू नये, घरीच थांबावे यासाठी हा खबरदारीचा उपाय आहे. यावर काही लोकांना टिकेची झोड उठवली आहे. नागरिकांची प्रतिष्ठा जपणे सरकारचं काम आहे आणि सरकार निर्बुद्धपणे काम करत असल्याची टीकाही सोशल मिडीयावर सुरू आहे.
करोना व्हायरस चा जगभर प्रादुर्भाव झाला आहे. भारतासारख्या अतिलोकसंख्येच्या देशात जर एखादी साथ पसरली तर जगातील छोट्या मोठ्या देशांच्या लोकसंख्येइतकी जनता आजारी पडू शकते. मुंबईसारख्या ठिपक्याएवढ्या शहरातच सव्वादोन-अडीच कोटी लोक राहतात. अशा वेळी एखादी साथ पसरली तर किती मोठ्या प्रमाणावर हानी होऊ शकते याचा अंदाजच लावता येऊ शकतो.
त्यात हा व्हायरस खासकरून परदेशातून भारतात आलेल्यांमध्ये आढळून आला आहे. विमानप्रवास करून आलेले साधारण ते असाधारण शिक्षित गटातले. त्यामुळे ते आपल्या तसंच समाजाच्या आरोग्याची प्रचंड काळजी घेतील अशी अपेक्षा. मात्र, संशयित रूग्णांच्या ज्या कहाण्या समोर आल्या आहेत. त्या धक्कादायक आहेत. एका कुटुंबाने तर दोन डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतरही हॉस्पिटल मध्ये दाखल होण्यास टाळाटाळ केली, अखेरीस संपूर्ण कुटुंबाला लागण झाल्यावर ते रुग्णालयात गेले. त्यांच्यामुळे ड्रायव्हर पासून बरेच जण अडचणीत आले. काही ठिकाणी विलगीकरण केलेल्या संशयित रूग्णांनी पळून जाऊन आपल्या सामाजिक जबाबदारीचं दर्शन ही घडवलेलं आहे.
विलगीकरण करण्यात आलेल्या संशयित रूग्णांना शासकीय रुग्णालयातील सुविधा पसंत नसल्याने त्यांना चांगल्या सुविधा हव्यात. सुविधा नसल्याने ते रुग्णालयात जायला तयार नाहीत. आर्थिक परिस्थिती ठीकठाक असलेल्या लोकांमध्ये सध्या या व्हायरस चा प्रादुर्भाव आहे, पण तो आर्थिक परिस्थिती बेताची किंवा हलाखीची असलेल्यांमध्ये वेगाने पसरू शकतो. अशा वेळी याची जबाबदारी समाजमाध्यमांमध्ये सामाजिक प्रतिष्ठेची चिंता करणारे घेतील का? श्रीमंत लोकांच्या सामाजिक प्रतिष्ठा आणि गरीब लोकांच्या सामाजिक प्रतिष्ठा वेगवेगळ्या असतात.
परळ चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कपाळावर नंबर टाकणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध आम्ही अंत:करणापासून केला. ती संवेदनहीनता होती. पण ज्या देशात पोलियोचा डोस पाजल्यावर बाळाच्या बोटाला शाई लावली जाते, ज्या देशात मत दिल्यावर बोटाला शाई लावली जाते. त्या देशात सामाजिक आरोग्यासाठी काही लोकांना शाई लावावी लागली तर बिघडलं कुठे?
यात दुमत नाही की,सरकार पॅनिक मोड वर आहे. संशयित/बाधित रूग्ण हे सध्या तरी ह्युमन बाँबच आहेच. दुसरं, या नागरिकांची पत्ते/ओळख गुप्त ठेवलीय, तरी ते स्वत:हून फोटो शेअर करतायत शिक्क्यांचे. नागरिक म्हणून आपण फेलच आहोत. सरकार हे त्याचंच सर्वोच्च प्रतिबिंब आहे. ज्या पद्धतीचे नागरिक आहेत त्यांना सरकारही तसंच मिळणार आहे. नागरिकांनीही आपापल्या जबाबदारीचं पालन करायला हवं.
सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हा सवाल ज्या संदर्भाने विचारला गेला होता तो सवाल तेव्हाही चुकीचाच होता आणि आजच्या संदर्भातही चुकीचाच आहे.