अनैसर्गिक प्रयोग करू नका हाच जनतेचा आदेश आहे !

Update: 2019-10-25 11:06 GMT

राज्यात भाजपा शिवसेना युतीला बहुमत मिळालंय. निवडणूकीपूर्व युती असल्याने महायुतीने सरकार स्थापन केलं पाहिजे असा स्पष्ट जनादेश आहे. या जनादेशामध्ये काहीच गोंधळ नाहीय. जनतेने हवेत गेलेल्यांना जमीनीवर आणलंय तर जमीनीत गाडले गेलेल्यांना नवीन अंकूर फोडला आहे. हे सगळं इतकं स्पष्ट असलं तरी राज्यात महायुतीचं सरकार थेट बसेल अशी स्थिती नाहीय. जनादेशात मोडतोड करण्याची तयारी सुरू आहे, महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांशी प्रतारणा सुरू आहे. राज्यातील सुज्ञ जनतेने हे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत.

लोकसभा निवडणुकीआधी भाजपाने सत्तेत ५०% वाटा देण्याचं कबूल केलं होतं, त्यामुळे त्यावर निर्णय होत नाही तोपर्यंत सरकार स्थापन होत नाही अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. सरकार बनवण्याची ही पूर्वअट जाहीरनाम्यात नमूद करून मगच मतदानासाठी अपिल करायला हवं होतं. शिवसेना सत्तेतल्या वाट्यासंदर्भात बोलत होती पण भाजपा हे उघड पणे टाळत होती. आज या मुद्दयावर सत्तेची नवीन समिकरणं निर्माण होताना दिसत आहेत.

शिवसेनेच्या मदतीशिवाय राज्यात भाजपाचं सरकार बनत नाही. त्यामुळे शिवसेनेचा भाव वधारला आहे. शिवसेना-एनसीपी आणि काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असं सरकार बनवून भाजपाला सत्तेपासून रोखलं पाहिजे असा एक विचार अनेक पुरोगामी लोकांनी मांडायला सुरूवात केली आहे. हा विचार घातक आणि लोकशाहीला मारक आहे. अनैसर्गिक आहे. शिवसेना आणि भाजपा ही नैसर्गिक आघाडी आहे. या आघाडीला लोकांनी जनादेश दिला आहे. मागच्या वेळेपेक्षा कमी जागा यंदा शिवसेना आणि भाजपाला मिळाल्या आहेत. लोकांनी त्यांना जमीनीवर येऊन काम करा असा आदेश दिला आहे. हा आदेश मोडायचा अधिकार कुणाला नाही. असं करायचं झालंच तर भाजपा आणि एनसीपी असा ही प्रयोग होऊ शकतो. लोकांच्या पाठीत खंजीर खुपसाचाच असेल तर कशाला कसली कसर ठेवा ना ?

हे ही वाचा

पराभव कुणाचा…?

ही वेळ आहे विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांनी आपापल्या घरी जाऊन आपल्या मतदार आणि कुटुंबासोबत दिवाळी साजरी करायची. सरकार अस्थिर करणं, घोडेबाजार करणं, राज्याच्या हितासाठी आम्ही तडजोड करतोय अशा स्वरूपाच्या भूमिकांपासून दूर जाऊन प्रामाणिकपणे विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारणे गरजेचे आहे. लोकांना तुम्हाला ताकद दिलीय विरोधी पक्ष म्हणून काम करण्यासाठी. जो पर्यंत ईडी ने तुमच्या कॉलर ला हात घातला नव्हता तोपर्यंत तुम्ही मनाने या सरकार सोबत होता. तुमच्या आत्मसन्मानावरच घाला घातल्यानंतर तुम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आलात, आता याच भूमिकेत कायम राहा.. सत्ता येई पर्यंत! समीकरणं खूप बनू शकतात, पण सत्तेच्या मोहापोटी कुठलेही अनैसर्गिक प्रयोग करू नका, हाच जनतेचा आदेश आहे!!!

हे ही वाचा

भावनिक मुद्दे नाही चालले की भाजपाची राजकीय नौका डुबू लागते !!

Similar News