Hathras rape case: रामराज्यातील बलात्कार...
जेव्हा आपण एखाद्या स्त्रीवर झालेल्या बलात्काराबद्दल बोलत असतो. तेव्हा आपण नक्की काय बोलत असतो? बलात्कार स्त्रीच्या होकारामुळेच होतो का? स्त्रीच्या नकाराला काही अर्थ असतो का? बलात्कार करण्यात कामवासनेचा संबंध असतो की नाही? हिंसा आणि वासना यांचे काय नाते आहे? वाचा बलात्कारी मानसिकतेवर प्रहार करणारा लेखिका मुग्धा कर्णिक यांचा लेख.
या देशात बलात्काराच्या घटनेत जात शोधून लाखालाखांच्या मोर्चाचं लाजिरवाणं राजकारण उभं रहातं…
1980 मध्ये सुहैला अब्दुलअली या तरुणीवर मुंबईत एका टोळीने बलात्कार केला. तेव्हा ती फक्त 17 वर्षांची होती. बलात्कारानंतर तिच्या भोवतालच्या समाजाची प्रतिक्रिया, कारवाई करण्यात पोलिसांनी दाखवलेला थंडपणा या सार्याने ती बलात्काराइतकीच हादरून गेली. या घटनेनंतर ती अमेरिकेत अभ्यासासाठी गेली आणि बलात्कारानंतर तीन वर्षांनी तिने ‘मानुषी’ या स्त्रीवादी मासिकात या घटनेवर एक लेख लिहिला. तिने त्यात स्वतःचे नाव लपवले नाही, सत्य पडदानशीन करणारे शब्दही वापरले नाहीत. प्रत्यक्ष बलात्कारानंतरच्या अत्याचारात जिवटपणे जगण्यासाठी काय काय करावे लागले? हे तिने अगदी स्पष्टपणे त्यात लिहिले. स्वतःवर झालेल्या बलात्काराबद्दल उघडपणे, निर्भीडपणे लिहिणारी, बोलणारी ती भारतातील पहिली स्त्री होती.
वयाच्या विसाव्या वर्षी सुहैला आपल्यावर झालेल्या बलात्कारावर जे लिहिते. त्यात तिच्या स्त्रीवादी विचारांची स्पष्टता आणि तिचे जगण्यावरील प्रेम ज्या तीव्रतेने व्यक्त होते त्याला केवळ सलाम.
चेंबूरजवळच्या एका टेकडीवर मित्राबरोबर संध्याकाळी फिरायला गेली असताना चार तरुण हातात विळे घेऊन आले. जिवाची धमकी देऊन त्यांनी तिच्या मित्राला धरून ठेवले, मारहाण केली. आणि या सतरा वर्षांच्या लहान मुलीवर दहावेळा बलात्कार केला. वर या बलात्कारी तरुणांनी अगदी आज चाळीस वर्षांनंतर संस्कृतीरक्षणाची जी भाषा वापरली जाते. तीच वापरून तिला सांगितलं- की असं संध्याकाळी कुणाबरोबर तरी फिरायला येणं चूक असतं. तुला धडा शिकवण्यासाठीच आम्ही हे करतो आहोत. आता शिकशील बरोबर…
जिवानिशी सुटल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार करण्याचा आग्रह धरला. वडिलांना घेऊन ती पोलीस स्टेशनला गेली तेव्हा पोलिसांनी विचारले, इतका वेळ बाहेर काय करत होतीस, एकट्या मुलाबरोबर कशासाठी टेकडीवर गेली होतीस, कपडे कोणते घातले होतेस, बरोबरच्या मुलाच्या अंगावर जखमा कशा नाहीत. (पोटावर विळ्याचं दांडकं मारल्यामुळे त्याला आतून रक्तस्राव झाला होता- पण ते दिसत नव्हते)- मग म्हणाले तुला महिला सुधारगृहात सुरक्षित ठेवावं लागेल… शिवाय तू विरोध का केला नाहीस? तुला मजा आली का…? हे ही प्रश्न आडून आले होते…
अनेक महिलांनी तिला असं सुचवलं की कौमार्यभंग झाला म्हणजे आता जगण्यात काहीही अर्थ राहिला नाही. बलात्कारापेक्षा मृत्यू पत्करला असं तर सार्वत्रिक मत होतं. नंतरची अनेक वर्षे सुहैला साध्या स्पर्शालाही दचकत असे, चालताना मागे पावलं वाजली तरी हादरून जात असे, पुरुषांच्या डोळ्यांत (अनेकदाच) दिसणारी ती नजर पाहिली की तिला जीव नकोसा होत असे… गळ्याभोवती घातलेला स्कार्फ म्हणजे कुणाचे तरी गळा दाबून धरणारे हात आहेत असा भास होत असे.
पण या सार्यामुळे पराभूत मनःस्थितीच्या गर्तेत न जाता सुहैलाने जगणं, लढणं हेच परम मानलं. अमेरिकेला गेल्यानंतर बलात्कार या विषयावरच त्यांनी संशोधन सुरू केलं.
सुहैला अब्दुलअली या आता साठीला आल्या आहेत. आणि बलात्काराची मानसिकता या विषयावर संशोधन करतानाच त्यांच्या इंग्रजीतील कांदबर्या, बालसाहित्य जगाच्या साहित्यपटावर आहेत.
जेव्हा 2012 मध्ये ज्योती सिंग पांडे या तरुणीवर दिल्लीत अमानुष बलात्कार झाला आणि देशभर या विषयावर चर्चा सुरू झाली तेव्हा सुहैला अब्दुलअली यांचा तो लेख पुन्हा एकदा वर आला. स्वतःची ओळख न लपवता लिहिणारी अजूनही ती एकमेव स्त्री होती. ज्योती सिंग पांडेचे नाव लपवण्याचा खूप आग्रह धरला गेला. तिचे नाव काव्यात्म शैलीत निर्भया ठेवले गेले. अजूनही बलात्कारित, पीडित स्त्रियांची ओळख लपवण्याचा आग्रह धरला जातो. त्यामागे संवेदनशीलता असते खरेच- पण ती संवेदनशीलता पितृसत्ताकवादी धारणांतून आलेली असते.
इंग्रजी न वाचणार्या वाचकांना सुहैला अब्दुलअली यांनी काय लिहून ठेवले आहे हे कधीच कळणार नाही म्हणून आज या विषयावर लिहिते आहे.
ऑक्टोबर 2018 मध्ये त्यांचे या विषयावरचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. आणि त्याचे नाव आहे- ‘व्हॉट वी टॉक अबाउट व्हेन वी टॉक अबाउट रेप’ – आपण बलात्काराबद्दल बोलतो. तेव्हा आपण कशाबद्दल बोलतो.
जगभरातील बलात्कारित स्त्रियांशी बोलून त्यांच्या आणि स्वतःच्या अनुभवांवर आधारून लिहिलेले हे पुस्तक आहे. त्यांनी स्वतः बलात्कारित स्त्रियांना मानसिक आधार देण्यासाठी काम केले आहे. तो अनुभवही यात प्रतिबिंबित झाला आहे.
बलात्कारित स्त्रियांना मागासलेल्या, पितृसत्ताकवादी बुरसट संस्कृतीत बुडालेल्या समाजात तर यापेक्षा मेली असती तर बरं असा अनुभव येतो. कुटुंबातही अशी प्रतिक्रिया अनेकदा उमटत असल्यामुळे त्या स्त्रीलाही तसेच वाटत जाते. अनेक बलात्कारित स्त्रिया आत्महत्या करतात किंवा अपमानित जिणे जगतात. सुहैला अब्दुलअली या परिस्थितीच्या मुळाशी जाणारे प्रश्न विचारतात. बलात्काराच्या घटनेसंबंधी समाजातील सर्वसाधारण दृष्टीकोन आणि बलात्कारित स्त्रियांसंबंधी गृहीत धरल्या जाणार्या गोष्टी क्रूर आहेत. आणि त्यामुळे बलात्कार झालेल्या अनेक मुली, स्त्रिया अनेकदा त्यासंबंधी अवाक्षरही काढत नाहीत. गुन्हा लपवून ठेवला जातो.
बलात्कार झाल्यामुळे पीडितेचे जीवन संपूर्ण बदलण्याची गरज आहे का? बलात्कार होणे हे मृत्यूपेक्षाही भयंकर आहे का? बलात्कार झालेल्या स्त्रीला आनंदाने परिपूर्ण जीवन जगता येते की नाही? या अनुभवामुळे दैनंदिन आयुष्य होरपळून निघते का? बलात्कार स्त्रीच्या होकारामुळेच होतो का? स्त्रीच्या नकाराला काही अर्थ असतो का? बलात्कार करण्यात कामवासनेचा संबंध असतो का की नाही? हिंसा आणि वासना यांचे काय नाते आहे? – अशा अनेक प्रश्नांना सुहैला वाचकांना सामोर्या जायला लावतात.
गेल्या काही दिवसांतच भारतात, शहरांतून आणि गावांतून निर्घृण बलात्कारांच्या बातम्या आल्या आहेत. तशा त्या नेहमीच येत असतात. पण नगरची एक मुलगी मुंबईत चार जणांच्या बलात्काराला बळी पडते. घरी येऊन काहीही न सांगता, तक्रार न नोंदवता बसून रहाते, तिचे शरीर कमरेपासून लुळे पडू लागते. तेव्हा हॉस्पिटलमधून घरच्यांना कळतं की तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. त्या वेदना सोसत, ताप सोसत ती मुलगी तशीच गप्प रहाते… आणि मग अखेर गुंतागुंत होऊन मरून जाते.
बिहारमध्ये एका गावात ज्या मुलीवर बलात्कार होतो, तिची आई पंचायतीकडे दाद मागण्यासाठी जाते आणि पंचायतीतले ज्येष्ठ पंच तीच वाईट चालीची म्हणून तिच्यावर बलात्कार झाला म्हणत तिचे डोके भादरून गावात तिचे धिंडवडे काढतात. ती मुलगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवते तेव्हा तिला कॅमेर्यासमोर आणलं म्हणून एक अती हुशार लोकांचं चॅनेल पोलिसांची चंपी करतं.
एका नगरसेवकाच्या बलात्काराच्या प्रयत्नांना हाणून पाडणार्या मायलेकींचं डोकं भादरून गाव त्यांची धिंड काढतं… हे सारं आजही या देशात घडतंय. या देशात बलात्काराच्या घटनेत जात शोधून लाखालाखांच्या मोर्चाचं लाजिरवाणं राजकारण उभं रहातं… आणि याच देशात दलितांच्या पोरीबाळींवर बलात्कार झाला तर ते नेहमीचंच ठरतं आणि जमिनीत जिरून जातं…
या देशातले नेतेच नव्हे तर अगदी सालस, साजुक घरांतली माणसंही बेदरकार निरागसपणे मुली असेतसे कपडे घालतात म्हणून बलात्कार होतात असं सांगतात. म्हणूनच मुलींना घराबाहेर पाठवू नये, जास्त शिकवू नये, स्त्रियांची खरी जागा घरातच आहे. वगैरे ज्ञान आता नव्या केशरिया भारतात नव्याने जोर धरू लागलं आहे.
पण एकीकडे ‘मी टू’ चळवळीत असल्याच सेमीबलात्काराला विरोध करणार्या निर्भय मुलामुलींचीही संख्या वाढते आहे. मैत्रीत, सहकार्यांत सोबतच्या लोकांवर विश्वास टाकताना घेतला जाणारा गैरफायदा आता लपवून ठेवता येत नाही. केवळ सत्तेत आहे म्हणून स्त्रियांना गृहीत धरणार्यांना उघडं पाडलं जात आहे.
हे पुस्तक स्त्री आणि पुरुषांनी जरूर वाचावे. आणि लक्षात ठेवावे कोणतीही स्त्री बलात्कार मागून घेत नसते. तो तिच्यासाठी सर्वात घाणेरडा अनुभव असतो. आणि तो करणारा पुरुष हा लैंगिक सुख ओरबाडण्यासाठीही तो करत असतो आणि आपली सत्ता गाजवण्यासाठीही करत असतो.
बलात्कार झालेल्या स्त्रियांच्या पाठीशी आपण सर्वांनीच उभं राहिलं पाहिजे. आणि भयानक अपघातात सापडलेल्या कुणालाही पुन्हा जीव वसवण्यासाठी जशी मदत मिळते तशीच त्यांनाही मिळाली पाहिजे. पोलीस, न्यायव्यवस्था वगैरे मंडळी बलात्कार्यांना शासन करतील की नाही ही शंका नेहमीच असेल. सत्य हा पुरावा होऊ शकत नाही. या कुबडीच्या आधाराने अनेक गुन्हेगार सुटत आले आहेत.
पुरावा नष्ट करण्याची एक समांतर यंत्रणा न्याययंत्रणेतच असू शकते हेही आपल्याला अनेक उदाहरणांत अनुभवाला आलेले आहे. पण या पलिकडे जाऊन अन्याय भोगलेल्या बलात्कारित स्त्रियांना- कदाचित बलात्कारित पुरुषांनाही (पुरुष बालकांवरही बलात्कार करतात हे समजून घ्या) आपण समजून घेऊन सामान्य, न्याय्य वागणूक दिली पाहिजे एवढे नक्की.
-मुग्धा कर्णिक