काबिनीच्या ब्लॅक पँथरला पाहताना...
वन्यजीवन आणि मानवाचा संबंध किती घनिष्ठ आहे याची जाणीव आपल्याला कोरोना संकटाने करुन दिली आहे. निसर्गाशी असलेली नाळ मानवाने तोडल्याने आपण काय काय गमावत आहोत आणि त्यासाठी काय केले पाहिजे, हे सांगणारा अर्घ्यम फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष रोहिणी निलकेणी यांचा लेख नक्की वाचा....;
ज्यांना त्याची प्रतिक्षा होती त्याला पाहतानाचा तो क्षण त्यांच्यासाठी सुंदर होता, पण माझ्यासाठी तर तो अविस्मरणीया क्षण होता. गेल्या अनेक वर्षांपासून मी त्या मोहक आणि दुर्मिळ प्राण्यासाठी कर्नाटकातील काबिनीच्या जंगलात वाऱ्या करत होते. हाच तो जगातील प्रसिद्ध असा ब्लॅक पँथर...ज्याला स्थानिक लोक कालिया म्हणून संबोधतात. कोरोना महामारीच्या गेल्या संपूर्ण वर्षात मला सुदैवाने काही दिवस जंगलात राहण्याची संधी मिळाली. पण मला ज्याचा शोध घ्यायचा होता त्याचा थांगपत्ताच लागत नव्हता.
13 डिसेंबर रोजी मी बंगळुरुच्या साहित्य उत्सवात 'Romancing The Black Panther' या परिसंवादात माझ्या या छंदाची जाहीरपणे माहिती दिली आणि अचानक माझे दुर्दैव संपले. बरोबर पाच वर्षांपूर्वी मी शोध सुरु केला होता आणि या परिसंवादाच्या 5 दिवसांनंतर मला कालियाचे दर्शन झाले.
आमच्या जीपपासून फक्त 30 फूट अंतरावर तो एका झाडावर ऐटीत बसला होता. मानवी दृष्टीला दिसण्यासाठी 30 फूट अंतर जास्त असले तरी त्याच्यावर रोखलेल्या चांगल्या लेन्स असलेल्या कॅमेऱ्यांना ते अशक्य नव्हते. काही लोकांनी मला विचारले की तो क्षण कसा होता. पण तो क्षण वर्णन करणे खरंच कठीण आहे. जसे मी माझ्या दुर्बिणीतून त्या काळ्या प्राण्याकडे पाहिले तशा त्या दुर्बिणीच्या लेन्स माझ्या अश्रूंनी ओल्या झाल्या होत्या.
त्यानंतर मला जाणीव झाली की मी त्या कालियाला पाहत असताना सर्वजण मला पाहत होते. माझ्या चेहऱ्यावर हास्य होते आणि मी नमस्कार करण्यासाठी माझे दोन्ही हात जोडले, मी आकाशाकडे पाहून पुटपुटले धन्यवाद...त्याचबरोबर मी वन्य प्राण्यांवरील फिल्म बनवणारे संदेश कडूर आणि माझ्या त्या सुह्रदांचे आभार मानले ज्यांनी मला इथे आणले होते. मी माझ्या प्रिय जंगलालाही धन्यवाद म्हटले. मी त्या कालियालाही धन्यवाद म्हटले...तोपर्यंत तो सावध होऊन आमच्याकडे एकटक पाहत होता.
काय सुंदर क्षण होता तो....मला वाटले की हा आनंदाचा परमोच्च क्षण आहे.
माझ्या या शोधाने मला संयम आणि नम्रता शिकवली. त्याचबरोबर यामुळे मला जंगल आणि आपले भवितव्य यांच्या संबंधांची गुंतागुंत आणखी सखोलपणे जाणता आली. यामुळे मी आता भारताची वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता आणि संवर्धन संस्कृतीच्या जतनासाठी माझा निर्धार आणखी दृढ केला आहे.
मी खरंच स्वत:ला धन्य समजते की मला काही क्षण त्या काळ्या बिबट्यासोबत राहता आले. मी काबिनीला पुन्हा पुन्हा येत राहिले....
त्यानंतर 6 मार्च रोजी आम्ही कालिया आणि त्याचा खूप आधीपासूनचा शत्रू असलेल्या बिबट्यामधील दुर्मिळ संघर्ष पाहिला. या बिबट्याला वन्यजीवांवर फिल्म बनवणारे शाझ जंग स्कारफेस म्हणून संबोधतात. कालियाने त्याला खुलं आव्हान दिले होते. सागाच्या एका उंच झाडावर ते होते, या झाडाची पानं काबिनीच्या कोरड्या मोसमात गळून पडली होती. पण डझनभर जीपमधील पर्यटकांसाठी हे आयुष्यातील खूप सुंदर दृश्य होते. या दोघांचा संघर्ष करडे डोळे असलेल्या मादी बिबट्यासाठी होता. जवळच कुठेतरी ती तिच्या हरवलेल्या पिल्लासाठी शोक करत होती.
हा संघर्ष आताच कुठे सुरू झाला आहे. मादी बिबट्यांचा प्रणयकाळ सुरू झाला असल्याने नक्कीच इतर बिबटे कालियाच्या भागात घुसखोरीचा प्रयत्न करु शकतात. त्यामुळे त्याला त्याच्या भागाचे संरक्षण करण्यासाठी सज्ज रहावेच लागेल. या संघर्षात कालियाच्या अंगावर आणखी व्रण उमटू शकतात पण कालियाचे साथीदार त्याला विजयी आणि तंदुरुस्त होऊन परतताना पाहण्यासाठी अधीर झाले आहेत.
गेल्या काही दिवसात कालिया अऩेकवेळा दिसल्याने जगभरातील वन्यजीव फोटोग्राफर्स आणि पर्यटकांचे लक्ष तिकडे वेधले गेले आहे. जगभरातील अनेकजण त्यांच्या प्रिय कालियाची एक झलक पाहण्यासाठी इकडे येण्याचे नियोजन करत आहेत. तो जगभरातील एकमेव ब्लॅक पँथर असल्याने त्याला पाहण्यासाठी हा भाग कायम पर्यटकांनी व्यापलेला असतो. त्याचे दर्शन आता पर्यटकांना मिळते आहे. पण कालिया आता 9 वर्षांचा आहे आणि बिबट्याचे सरासरी आयुष्य 12 वर्षांचे असते. त्यामुळेच आमच्यासारखे काही जण वारंवार येऊन अधाशासारखे त्याला डोळ्यात साठवून घेत असतो.
पण काबिनीच्या जंगलात आणखी खूप काही आहे. यंदाही इथे कमी पाणी आहे आणि पानझडीमुळे जंगल मोकळे दिसत असल्याने प्राण्यांचे दर्शन सहज होते.
अनेकजणांना बिबट्यांपेक्षा वाघ आवडतात. यावर्षी त्यांना मेजवानीच मिळणार आहे. काबिनीच्या जंगलात वाघिणीचा एक परिवार आहे जो सध्या अभ्यासक आणि फोटोग्राफर्सचे आकर्षण ठरला आहे. या वाघिणीला गेल्या तीन वर्षात 6 पिल्लं झाली आहेत. जंगलात ही वाघीण तिच्या पिल्लांसोबत मुक्तपणे विहार करताना दिसते. म्हणजे हे पाळणाघरच वाटते. जेव्हा वाघांना एकाचवेळी 4 पिल्लं होतात तेव्हा ती सर्वच जगणे दुर्मिळ असते. पण तुम्ही जर भाग्यवान असाल तर तुम्हाला एकाचवेळी 5 वाघ एकत्र खेळताना दिसतील म्हणजे एक वाघीण, तिची 1 वर्षाची तीन पिल्ले आणि एक छोटूसे पिल्लू....
लहान भावंडांसोबत मोठ्या पिल्लांची गट्टी तशी जमणे कठीण असते किंवा ते आईसोबत एवढ्या शांतपणे राहणेही कठीण असते. काबिनीमध्ये या सगळ्यांना एकमेकांसोबत राहताना, फिरताना पाहणे खरंच विलोभनीय असते. काबिनीमधला उन्हाळा सुंदरच असेल. लोक या ठिकाणी आणि इतर जंगलांमध्येही गर्दी करतीलच... अगदी कवी वेंडेल बेरीच्या कवितेप्रमाणे जंगलातील शांतता अनुभवतील....
पण संवर्धन तज्ज्ञ मात्र सांगतात की आपण या वन्यप्राण्यांबद्दल आपले नैसर्गिक आकर्षण जरा नियंत्रणात ठेवले पाहिजे. अन्नसाखळीतील सर्वात छोट्या प्राण्यांचे महत्त्व असते त्याशिवाय हे प्राणीसुद्धा जगू शकत नाहीत. या उन्हाळ्यात तरी आपण अपेक्षा करुया की कोरोनाबाबतची खबरदारी घेत आपण निसर्गातील या मोठ्या प्राण्यांना आपल्या डोळ्यांनी पाहू शकू.
काबिनीमध्ये हे सोपे आहे. काबिनीमधील पर्यटन हे राज्य सरकारच्या लॉज आणि रिसॉर्ट्स विभागामार्फत सांभाळते जाते. जंगलातील जैवविविधतेचा विचार करुन इथे गाड्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे, त्यामुळे इथे खूप वर्दळ नसते. पर्यटकांवर इथे अनेक निर्बंध आहेत आणि अभयारण्य हे कचरामुक्त ठेवण्यासाठी वनविभाग आणि स्वयंसेवक सज्ज असतात.
काबिनीच्या जंगलात पुन्हा पुन्हा येणाऱ्यांना दरवेळी काहीतरी नवीन अऩुभव मिळत असतो. इथे मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. हे जंगल काही प्रमाणात मानवनिर्मित तर काही प्रमाणात नैसर्गिक आहे. काबिनीच्या जलाशयामुळे इथल्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. पण या स्वर्गाबाबत काय दक्षता घ्यावी लागते. इथे पर्यकांनी केवळ सौंदर्य पाहण्यासाठी आलेले ग्राहक न बनता विश्वस्त बनण्याची अपेक्षा आहे. आपण जंगलात उत्सुकतेने आणि नम्रतेने जाऊ शकतो का आणि या जंगलाची भव्यता आपण स्वीकारु शकतो का? आता आपण कोरोना संकटातून सावरत आहोत, पण या काळात आपला वन्यजीवांशी किती जवळचा संबंध आहे हे आपल्याला उमगले आहे. त्यामुळे निसर्गाशी तुटलेली आपली नाळ पुन्हा जोडण्यासाठी हाच योग्य काळ नाही का?
माझ्यापुरता बोलायचे तर मी निसर्गाची विश्वस्त म्हणून काम कायम ठेवणार आहे. लोक मला विचारतात की आता कालियाला पाहिल्यानंतर तरी मी शांत बसणार आहे की नाही. तो मला खुणावून सांगतोय की त्याच्या पलीकडे जाऊन जंगलाच्या ह्रदयात शिरून पाहा तिथे तुला नक्कीच मानवी ह्रदय आढळेल.
- रोहिणी निलकेणी ह्या शाश्वत जल आणि स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या अर्घ्यम फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष आहेत.