सणांच्या दिवसात आनंदाला तोटा नसावा अशी सर्वांची इच्छा असते. सण साजरे करताना आप्तेष्टांसोबत चांगला वेळ घालवावा, आनंदी राहावं, खावं-प्यावं, चांगले कपडे घालावेत, परिवाराला क्वालिटी टाइम द्यावा ही सर्वसाधारण संकल्पना आहे. या संकल्पनेप्रमाणे सामान्यतः माणसं आपलं नियोजन करतात. काहींच्या नियोजनात आनंद विकत घेण्यावर भर असतो आणि मग सणांच्या दिवसांमध्ये वारेमाप खर्च-उधळपट्टी, ऊसनवार दिसून येते. कदाचित याचमुळे ऋण काढून सण साजरे करू नयेत यासारख्या म्हणी रूढ झालेल्या असाव्यात.
दिवाळी ऐन तोंडावर आहे, नव्हे दिवाळीचा सण सुरूच झाला आहे. यंदा लोकांनी जास्तीत जास्त खरेदी करावी अशी सरकारची इच्छा आहे. त्याचमुळे स्वतः पंतप्रधानांनीही मेक इन इंडीया प्रॉडक्टच घ्या असा सल्ला देऊन लोकांशी चर्चा केली होती. मार्केट ला खेळतं राहण्यासाठी पैसा लागतो, तो पैसा लोकांच्या हातात आला की बाजारात येतो, बाजारात आला की अर्थव्यवस्थेचं चाक हलतं. या सर्वसामान्य मान्यतेप्रमाणे बाजाराची इच्छा आहे की लोकांनी खरेदीसाठी बाहेर पडावं. आपण कितीही निर्बंध घातले, प्रबोधन केलं तरीही सामान्यतः जनभावना ही सणांच्या दिवसांत काही ना काही खर्च करण्याची असतेच. आजही बाजार सजलेला आहे, कोविड मुळे जवळपास १८ महिने लोकांच्या आर्थिक उत्पन्नाच्या स्त्रोतांवर गंभीर आघात झालेला आहे, अशा परिस्थितीत बाजारात तरलता नसल्याने मोठी समस्या निर्माण होईल असे तज्ज्ञांचे अंदाज होते, मात्र सरकार आपल्या प्रचारात वापरत असलेले सगळे ग्राफ अर्थव्यवस्थेचे हिरवंगार चित्र दाखवत आहे. शेअर बाजार हा काही अर्थव्यवस्थेचा निदर्शक नसतो, मात्र तरी सामान्य माणसाला भुरळ घालण्यासाठी शेअर बाजाराचं उदाहरण दिलं जातं. शेअऱ बाजारात मोठमोठे सौदे होतायत. गाड्यांची खरेदी जोरात होतेय. घरांची खरेदी ही वाढताना दिसत आहे, बँकांच्या ठेवींमध्ये ही वाढ झाल्याचे आकडे दिले जातायत. दुसरी कडे बेरोजगारीची संख्या वाढतेय, गरीबांच्या संख्येत वाढ झालीय, भूक निर्देशांकात ही भारत वर सरकल्याचं चित्र आहे, महागाई ही वाढलीय. याचा अर्थ गरीब अधिक गरीब आणि काही ठराविक वर्ग या ही काळात श्रीमंत होतोय. अदानी-अंबानीच्या संपत्तीत प्रचंड वाढ झालीय हे याचंच निदर्शक आहे.
गरीबी वाढतेय, मात्र याची चर्चा करायची नाही असं एकूण धोरण सर्वांनी अवलंबल्याचं चित्र दिसतंय. आजार आहे असं मान्य न केल्याने त्यावर उपचार ही होताना दिसत नाहीय. मात्र, अर्थव्यवस्थेचं अतिशय चांगलं चित्र प्रसार माध्यमांमधून रंगवलं गेल्याने सामान्य माणूस ही निर्ढावलेला दिसतोय. सध्या तोट्यात चाललेल्या काही संस्थांमधील अनेक कामगार संघटनांनी बोनससाठी आंदोलनं ही पुकारलीयत. काही ठिकाणी प्रचंड नफा कमवलेल्या कंपन्यांनी कामगार कपात करून कंत्राटी पद्धत तसंच ऑटोमायजेशन अवलंबल्याचं ही चित्र दिसतंय. तर कोविड मुळे आर्थिक नियोजन ढासळलेल्या काही कंपन्यांनी कामच बंद करण्याची घोषणा केलीय. अत्यंत विचित्र परिस्थिती सध्या आसपास दिसतेय. अशा वेळी सामान्य लोकं बाजाराच्या प्रेशर मुळे खरेदीला बाहेर पडताना दिसतायत. शेजाऱ्यांनी मोठी खरेदी केली म्हणून आपण ही करावी असं प्रेशन दिवाळीने वर्षानुवर्षे गरीब आणि निम्न मध्यमवर्गावर टाकलंय. याच प्रेशरमुळे काहींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले, त्यांना श्रीमंत होण्याचं मोटीवेशन मिळालं, तर अनेकांनी या प्रेशरसमोर गुडघे टेकले, हार पत्करली.
सण साजरे करत असताना अनेकांना संपत्तीचं अनावश्यक दर्शन करण्याची ही सवय लागलेली दिसते. खरं तर हा एक आजार आहे, आपला आनंद इतरांच्या दुःखाचं कारण बनता कामा नये. आनंद वाटता यायला पाहिजे, त्यामुळे सणांच्या काळात हा आनंद वाटण्यावर भर द्यायला हवा, त्याचा बाजार होता कामा नये. त्यामुळे या वर्षी सण साजरे करत असताना गेल्या दीड वर्षांत आपण कुठल्या मोठ्या संकटातून बाहेर पडलो आहोत याचं थोडं भान बाळगणं गरजेचे आहे. कोविड काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, पगार कपात झाली आहे याचं भान राखलं पाहिजे. खास करून दिवाळीत ध्वनी आणि वायू प्रदूषणासोबत धार्मिक प्रदूषणही वाढतं. कोविडमुळे अनेकांची फुफ्फुसे निकामी झालेली आहेत, कमी क्षमतेने काम करतायत, ऑक्सिजन ची गरज काय आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. अशा वेळी लोकांना सद्सद्विवेक बुद्धी वापरायला सांगण्याची ही सोय राहिलेली नाही. आमचा धर्म-आमचा सण असला की असे सल्ले का सुचतात असा प्रतिवाद करणाऱ्यांची ही एक जमात आलेली आहे. सण-आनंदाला कसला धर्म. ज्यात सर्वांचा आनंद तोच सण. त्यामुळे या दिवाळीत आणि त्यानंतर अगदी नववर्षाच्या स्वागताच्या सणापर्यंत सरत्या वर्षाला निरोप देत असताना किमान इतकं भान बाळगूया. सणांचं प्रेशर कुणावर येता कामा नये, आपल्या वागण्यातून असा संदेश द्यायचा प्रयत्न करूया.