लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. त्यांना अवघ्या ४८ वर्षांचं आयुष्य लाभलं. तरीही इतक्या अल्पावधीतच त्यांनी केलेले विविधांगी कार्य चकित करणारं आहे. २०२० हे त्यांचं जन्मशताब्दी वर्षही आहे. या निमित्ताने त्यांच्या अभूतपूर्व प्रतिभेचा हा थोडक्यात आलेख
सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथं १ ऑगस्ट १९२० रोजी तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांचा एका दलित कुटुंबात जन्म झाला. चौथीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं. गावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे त्यांना उपजीविकेसाठी गाव सोडावं लागलं. मजल दरमजल करीत त्यांनी पायीं पायी मुंबई गाठली.
मुंबईत आल्यावर त्यांनी पडेल ती कामं केली. समाजातील विषमता त्यांना अस्वस्थ करीत होती. यातूनच ते शहराकडे वळले. तसे त्यांच्या घरात लोककलेची परंपरा होती. प्रारंभी त्यांच्यावर कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव पडला.
ते कम्युनिस्ट पक्षाच्या लाल बावटा कला पथकाचे सदस्य झाले. या पथकात त्यांच्या सोबत शाहीर दत्ता गवाणकर, शाहीर अमरशेख सुद्धा होते. या पथकाने जागोजागी जन जागरण केले. पुढे मात्र, ते डाँ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन आंबेडकरी चळवळीत दाखल झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते अग्रेसर होते.
अण्णाभाऊ ज्या परिस्थितीत जन्मले, वाढले, जे जीवन ते जगले. याचा त्यांच्या लेखणीवर अमीट परिणाम झाला. त्यांची फकिरा ही कादंबरी त्यांच्या जीवनमुल्याची साक्ष आहे. ब्रिटिशांच्या आणि समाजातील अनिष्ट चालीरितींविरुद्ध बंड करणाऱ्या तरुणाची ही कथा आहे. या कादंबरीला राज्य शासनाचा उत्कृष्ट वांड्:मय पुरस्कार मिळाला.
अण्णाभाऊंनी ३५ कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या कथांचे १५ संग्रह प्रकाशित झाले आहेत. १२ चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. रशियाला जाऊन आल्यावर त्यांनी रशियाचं प्रवास वर्णन लिहिले आहे. भारतातील अनेक तसेच २७ परकीय भाषांमध्ये त्यांचं साहित्य अनुवादित झालं आहे. यावरूनच त्यांच्या साहित्याची थोरवी स्पष्ट होते.
भारतात अभिनव ठरलेल्या महाराष्ट्रातील दलित साहित्याचे त्यांना जनक समजल्या जाते. १९५८ साली मुंबईत भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात त्यांनी "पृथ्वी ही शेषाच्या शिरावर नसून ती दलित आणि श्रमिकांच्या शिरावर उभी आहे," असे ठणकावून सांगितले.
"मुंबईची लावणी", "मुंबईचा गिरणी कामगार" या त्यांच्या प्रखर गीतांमधून मुंबईतील, पर्यायाने समाजातील विषमतेवर प्रहार केले आहेत.
"जग बदल घालुनी घाव, सांगूनी गेले मला भीमराव" या त्यांच्या ओळी आजच्या पिढीलाही प्रेरणा देत आहेत. १८जुलै १९६९ रोजी त्यांचा मृत्यू झाला. अवघे ४८ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. पण एवढ्या अल्प काळात त्यांनी निर्माण केलेलं अफाट साहित्य म्हणजे त्यांच्यातील प्रतिभेचा उत्तुंग आविष्कार आहे.
महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाने १९८५ साली अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ स्थापन केले. भारत सरकारने १ ऑगस्ट २००२ रोजी टपाल तिकीट प्रकाशित केले. पुणे येथे त्यांचे स्मारक आहे. तर मुंबईत कुर्ला येथील उड्डाण पुलाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.अशा या महान प्रतिभावंताला विनम्र अभिवादन.
-देवेंद्र भुजबळ.9869484800.