प्रा. मोहन मोरे हे नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातील खरबी (दराटी) गावचे मूळ रहिवाशी... दाट वनराई, झाडी, जंगलानं वेढलेल्या अभयारण्यातील आदिवासी बहुल किनवट तालुक्यातील खरबी येथे जन्म झाला. मोहन मोरे यांचे वडील गावोगावच्या बाजाराला जात त्या बाजारात कापड विकण्याचा उद्योग करत असत. मात्र, मोहन हा खूप शिकावा, मोठा माणूस व्हावा हे मनोमन त्यांना वाटत असे म्हणून त्यांनी मोहनला त्यांच्या मामाच्या गावी उमरखेड येथे शिक्षणासाठी पाठवले. त्याच ठिकाणी मोहनचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक व महाविद्यालयिन शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मामाच्या शाळेत किनवट येथील गोकुंदा येथे मुख्याध्यापक म्हणून शाळेवर लागले.
नोकरी सुरू असताना मोहनला रेल्वे च्या केंद्रीय शाळेत नोकरीची संधी मिळाली. त्यानंतर ते परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे रेल्वेच्या केंद्रीय विद्यालयात नोकरीस लागले. पण त्याठिकाणी काम करत असताना त्यांना जो मुख्याध्यापक पदाचा अनुभव होता त्यावरून त्यांना कार्यालयीन काम सोपवल्या जायचे. या दरम्यान मोहन यांना पूर्णा येथे मुलींची शाळा नसल्याचे लक्षात आले आणि त्यांनी 1983 ला जगदंबा विद्या प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना करत त्यावेळचे तत्कालीन मंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मदतीने पहिली महिला शाळा व वसतिगृह पूर्णा येथे आणले. आणि त्यानंतर मोहन मोरेनी मागे वळून पहिलेच नाही. हिंगोली, परभणी, नांदेड, पुसद, यवतमाळ या जिल्ह्यात कितीतरी शाळा, महाविद्यालय, वसतिगृह अशा तब्बल 21 शाळा महाविद्यालयाचे जाळेच विणले. ज्यात एक आदिवासी पाडयावरील कापड व्यवसायिकाचा मुलगा शिक्षक ते थेट संस्थानिक झालाय.