नेहरूनीं दूरगामी विचार करून हिंदू महासभेकडे ओढ असलेलं राजघराणं काॅंग्रेसजवळ आणलं होतं. नेहरूच्यां पूढच्या पिढ्यांनी त्यांना पुन्हां त्याच दारात नेऊन सोडलंय. मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक राज असरोंडकर यांचा मध्यप्रदेशतील राजकीयघडामोडींवर टाकलेला दृष्टीक्षेप
स्वतंत्रतापूर्व काळापासून सिंधिया घराण्याची हिंदू महासभेशी जवळीक होती. नेहरूंना या गोष्टीची जाणीव होती. म्हणूनच त्यांनी ग्वाल्हेर संस्थानचे राजे जिवाजीराव यांना काॅंग्रेसमधून निवडणूक लढण्यासाठी गळ घातली; पण ते तयार नव्हते. नेहरूंनी आपला प्रयत्न सोडला नाही. त्यांनी जिवाजीराव यांची पत्नी लेखा दिव्येश्वरी देवी म्हणजेच विजयाराजे यांना इंदिरा गांधींच्या माध्यमातून निवडणुकीसाठी तयार केलं.
१९५७ च्या लोकसभा निवडणुकीत विजयाराजे काॅंग्रेस पक्षाच्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. हिंदू महासभेच्या व्ही जी देशपांडेंचा पराभव करताना एकूण मतदानापैकी ६६ टक्के मतांचा वाटा विजयाराजेंना लाभला होता. १९६७ मध्ये काॅंग्रेसशी मतभेद झाल्यावर विजयाराजे स्वतंत्र पार्टीकडून लढवय्या आणि जिंकून आल्या. २ लाख ९३ हजारांपैकी २ लाख ३१ हजार म्हणजे ७८ टक्के मतं त्यांच्या पारड्यात होती. काॅंग्रेसशी फारकत घेऊन विजयाराजे तिथेच थांबल्या नव्हत्या. मध्यप्रदेशातलं डी पी मिश्रांचं सरकार त्यांनी पाडलं होतं.
बस्तरमध्ये पोलिसांनी केलेल्या एका गोळीबाराच्या घटनेत ११ लोक बळी गेले होते. त्यात एक राजघराण्यातील सदस्य व्यक्ति होती. विजयाराजे हा मुद्दा घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री डी पी मिश्रांकडे गेल्या. त्यांनी त्यांना भेट न देता ताटकळत ठेवलं. तक्रारीला प्रतिसादही दिला नाही. विजयाराजेंनी तो विषय इंदिरा गांधींकडे नेला. काॅंग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांकडे नेला, पण दाद मिळाली नाही. अखेर राजघराण्याच्या प्रभावाखाली असलेल्या आमदारांची संयुक्त विधायक दल नावाने मोट बांधून विजयाराजेंनी डी पी मिश्रांचं सरकार पाडलं आणि सोबत केवळ काॅंग्रेसशीच नव्हे, तर इंदिरा गांधींशीही पंगा घेतला. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात विजयाराजेंना तुरूंगात डांबून त्याचा वचपा काढला. इतकंच नाही तर जनसंघाच्या माध्यमातून राजकारण करणाऱ्या त्यांच्या मुलाला माधवरावांनाही काॅंग्रेसमध्ये खेचलं. विजयाराजेंसह ही गोष्ट मोठी क्लेषदायक ठरली.
विजयाराजेंच्या प्रभावाचा फायदा मिळेल या आशेवर मध्यप्रदेशातून ग्वाल्हेरमधून निवडणूक लढवणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींसमोर काॅंग्रेसने माधवराव सिंधियांना उभं केलं तेव्हा विजयाराजेंचं राजकारण कोंडीत सापडलं होतं. पण त्या पक्षासोबत राहिल्या. तरीही माधवराव मोठ्या फरकाने निवडून आले. राजीव गांधींशी त्यांची नेहमी जवळीक राहिली. तोच वारसा राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य यांच्या मैत्रीने चालवला.
पण राजकारणातील घडामोडी शाश्वत नसतात. त्यात कालसुसंगत चढउतार होत असतात. कधी कधी इतिहासाची पुनरावृत्ती होते. काॅंग्रेसमधली घुसमट सहन न झाल्यावर विजयाराजेंनी त्याविरोधात राजकीय पलटवाराने उत्तर दिलं. आज त्याच टप्प्यावर ज्योतिरादित्य यांचं राजकारण येऊन ठेपलंय. काॅंग्रेसने विजयाराजेंच्या बंडावर माधवरावांचा उतारा दिला होता. आज माधवराव यांच्या जन्मतिथीची वेळ साधून ज्योतिरादित्यांनी बंडाचा झेंडा रोवलाय.