‘स्वाईन फ्लूचे आतापर्यंत ५ बळी.’
‘पुण्यानंतर आता मुंबईतही लागण…’
उत्तर न मिळालेले काही प्रश्न -
हा रोग असाध्य आहे का?
टॅम्लिन फ्लू की कायसं, एवढं एकच औषध उपयोगी आहे का?
फक्त हवेतूनच पसरतो की अन्न-पाण्यातूनही?
लक्षणं काय आहेत?
असे बरेच प्रश्न अनेकांना भेडसावत असतात. जगभरात कहर माजवणार्या या स्वाईन फ्लूच्या साथीमुळे कित्येकांच्या मनात दहशत निर्माण झालीय. दररोज पेपरचे रकाने मृतांच्या आकड्याने भरलेले असतात. एकट्या भारतात डिसेंबरपासून सुमारे १५०० लोक या रोगाला बळी पडले आहेत. गुजरात आणि राजस्थानात ही संख्या जरी जास्त असली तरी झपाट्याने इतर शहरांतही हा रोग पसरत चालला आहे.
अशा या परिस्थितीत इंटरनेटवर नेटाने जनजागृती करण्याचं काम जोमाने सुरू आहे. व्हॉट्स अॅपवर तर नैसर्गिक उपायांनी हा फ्लू कसा टाळता येईल या महितीला पेवच फुटलय. कुणी म्हणतं, वॅक्सीन घ्या.. कुणी म्हणतय होमिओपॅथीतल "इन्फूएंझिनम" घ्या.. कुणी म्हणतय आयुर्वेदिक औषधी घ्या.. बहुतांश माहिती खरी की खोटी याचा पडताळा न करता ती फॉरवर्डही केली जात आहे. इन शॉर्ट स्वाईन फ्लूचं मार्केटिंग उत्तमरीत्या सोशल मीडियावर सुरू आहे.
स्वाईन फ्लू हा जुलै २००९ पासून मोठा चर्चेचा व चिंतेचा विषय बनला आहे. हा आजार मनुष्यामध्ये तीव्र श्वसनाच्या अनेक लक्षणांसह आढळतो. मेक्सिकोने नुकत्याच केलेल्या परीक्षणात नवीन स्वाईन A (H1N1) विषाणूची नोंद करण्यात आली. आजवर याचा तीव्र प्रादुर्भाव मेक्सिको शहरात झालेला आहे. अमेरिकेत मात्र याचा प्रादुर्भाव फारच कमी प्रमाणात झाला. योग्य वेळी योग्य ती खबरदारी न घेतल्यास त्याचा प्रसार वेगाने होऊ शकतो.
फ्लू म्हणजे काय?
तर 'इन्फ्लूएंन्झा A or B' नामक विषाणूमुळे जेव्हा सर्दी-ताप-अंगदुखी अशी लक्षणं येतात तेव्हा त्या आजाराला वैद्यकीय परिभाषेत 'फ्लू' असं संबोधतात.
मुळात स्वाईन फ्लू हा श्वसनाचा आजार "इन्फ्लुएंझा A नामक" विषाणू श्वसनमार्गाच्या संपर्कात आल्यामुळे होतो. डुक्कर या प्रजातीमध्ये प्रामुख्याने याचा प्रदुर्भाव आढळून आल्यामुळे याला "स्वाईन फ्लू" हे नाव पडलं. या आजारात खोकला, भूक मंदावणे, नाक गळणे, थकवा येणे अशी सर्वसाधारण फ्लूसारखीच लक्षणे डुकरांमध्ये दिसतात. डुकरांचा हा आजार साधारण एक ते दोन आठ्वड्यात बराही होतो. पण हा विषाणू स्वतःत अनुकूल बदल घडवून मानव प्रजातीतसुद्धा संक्रमित होऊ शकतो. सर्वात प्रथम या विषाणूचा प्रदुर्भाव २००९ साली मेक्सिको येथे आढळून आला.
स्वाईन फ्लूचा विषाणू हवेत आठ तास जिवंत राहू शकतो. स्वाइन फ्लू विषाणूबाधित व्यक्तीच्या खोकण्याने किंवा शिंकण्याने हवेत उडणाऱ्या तुषारातील विषाणू धूलिकणवेष्टीत स्वरूपात जिवंत राहतात. तसेच हे विषाणू खुर्ची, टेबलसारख्या ठिकाणीही जिवंत राहतात. या विषाणूंचा नाक, डोळे, तोंड यासारख्या घ्राणेंद्रियांशी संपर्क झाल्यास विषाणूंचे संक्रमण होते. डुकराचे मटन खाणे व स्वाइन फ्लू यात काहीच संबंध नाही.
स्वाइनफ्लू हा संसर्गजन्य आजार असून त्याच्या विषाणूंचे तीव्र स्वरुप म्हणजे टॉमी फ्लू होय. स्वाइन फ्लूच्या विषाणूंची लागण झाल्यास १ ते ७ दिवसांतच त्याची लक्षणे दिसू लागतात. स्वाइन फ्लूची लागण झाल्यापासूनच ४८ तासांत त्या रुग्णाला टेमीफ्लू औषधे द्यावी लागतात. फ्लूच्या विषाणूंच्या लक्षणांच्या वर्णनावरूनच स्वाइन फ्लूच्या A (H1N1) विषाणूचे निदान होते. स्वाइन फ्लूवर सर्वसाधारण फ्लूचेच उपचार केले जातात. डॉक्टरांच्या सल्ल्यावरूनच प्रतिबंधक औषधे दिली जातात.
(क्रमश:)